लडाखमध्ये चिनी नागरिकांची घुसखोरी
By Admin | Updated: September 16, 2014 03:21 IST2014-09-16T03:21:49+5:302014-09-16T03:21:49+5:30
सरकारी वाहनांमधून लडाखच्या डेमचोक भागात घुसलेल्या चिनी नागरिकांनी भारतीय मजुरांना सिंचन प्रकल्पावर काम करण्यास मज्जव केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.

लडाखमध्ये चिनी नागरिकांची घुसखोरी
लेह/ नवी दिल्ली: सरकारी वाहनांमधून लडाखच्या डेमचोक भागात घुसलेल्या चिनी नागरिकांनी भारतीय मजुरांना सिंचन प्रकल्पावर काम करण्यास मज्जव केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. ते चीनचे सैनिक होते की नाही, याचा खुलासा होऊ शकलेला नाही. चीनचे अध्यक्ष शी जिपिंग यांच्या भारतभेटीच्या तोंडावरही चीनच्या कुरापती थांबलेल्या नाहीत.
चीनसोबत सीमा प्रश्नावर चर्चा केली जाणार असल्याचे सांगत केंद्र सरकारने या घटनेला फारसे महत्त्व देण्याचे टाळले आहे. भारत-चीन सरहद्दीवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ डेमचोक या गावी सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पाच्या कामावर चीनने आक्षेप घेतल्याचे वृत्त खरे असल्याचे लेहचे उपायुक्त सिमरनदीपसिंग यांनी सांगितले.
चीनने हे काम थांबविण्यास तोशिगांग गावातील रहिवाशांना अनेक सरकारी वाहनांमधून भारतीय हद्दीत आणले. भारतीय नागरिकांना काम करू न देण्याचा त्यामागे उद्देश होता. (वृत्तसंस्था)
लष्कराने बाळगले मौन..
गावक:यांसंबंधीच्या वृत्तावर भाष्य करण्यास भारतीय लष्कराने नकार दिला आहे. तत्पूर्वी चुशूल येथे झालेल्या ब्रिगेडियर स्तरावरील ध्वज बैठकीत सीमेवरील घुसखोरीच्या मुद्दय़ावर चर्चा झाल्याचा लष्करी मुख्यालयाने इन्कार केला आहे.