पँगाँग लेक भागात चीनची घुसखोरी
By Admin | Updated: November 4, 2014 04:28 IST2014-11-04T04:28:09+5:302014-11-04T04:28:09+5:30
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) अलीकडेच पँगाँग लेकमधील भारतीय जलभागात घुसखोरी केल्याचे वृत्त आहे.

पँगाँग लेक भागात चीनची घुसखोरी
लेह/नवी दिल्ली : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) अलीकडेच पँगाँग लेकमधील भारतीय जलभागात घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. चीनने याच भागात खुष्कीच्या मार्गानेही आपले सैन्य पाच कि. मी. पर्यंत घुसवून दुहेरी घुसखोरी केली.
पीएलएच्या बोटींनी आधी पँगाँग लेकमधून भारतीय जलहद्दीत प्रवेश केला आणि त्यानंतर याच पँगाँग लेकजवळ बांधलेल्या रस्त्यावरून भारतीय हद्दीत घुसखोरी केली, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या २२ आॅक्टोबर रोजी चीनने ही घुसखोरी केली. हा परिसर पूर्व लदाखमध्ये आणि लेहपासून १६८ कि. मी. अंतरावर आहे.
चीनने जल आणि जमीन अशा दोन्ही मार्गाने एकाचवेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. तथापि चीनची ही घुसखोरी दक्ष असलेल्या भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांनी पँगाँग लेकमधील काल्पनिक रेषेवर (हीच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा मानली जाते) चिनी सैनिकांना रोखले. यासोबतच नियंत्रण रेषा पार करून सडक मार्गाने पर्वतीय प्रदेशाकडे जाणाऱ्या चिनी सैनिकांच्या वाहनांनाही रोखण्यात आले. (वृत्तसंस्था)