नवी दिल्ली: आर्टिफिशल इंटेलिजन्स, रोबोटिक्ससारख्या क्षेत्रांमध्ये चीननं मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आपण मंदिर, मशिदीच्या गोष्टी करत राहिल्यानं केवळ वेळ फुकट जाईल. धर्म, जातपात विसरुन एक देश म्हणून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता असल्याचं मत माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या प्रेम भाटिया स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर आपण विविध भेदाभेदांमध्ये अडकून पडलो. कधी धार्मिक, कधी भाषिक तर कधी जातीपातीचे वाद समोर येत गेले. यात आपली बरीच उर्जा खर्च झाली, असं प्रकाश म्हणाले. 'देशाला मागे नेणारे वाद वारंवार उकरुन काढण्याची नव्हे, तर ते कायमस्वरुपी संपवण्याची आवश्यकता आहे. चीनमध्ये सध्या आर्टिफिशयल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता), रोबोटिक्स आणि मशीन लर्निंगची चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीनं संशोधनदेखील केलं जात आहे. अशा परिस्थितीत आपण जर मंदिर आणि मशिदीवर बोलणार असू तर त्या केवळ निरर्थक गप्पा ठरतील,' असं प्रकाश म्हणाले. अरुण प्रकाश यांनी 2004 ते 2006 या कालावधीत नौदल प्रमुख होते. देशांतर्गत सुरक्षेचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं मत प्रकाश यांनी व्यक्त केलं. देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये शांतता प्रस्थापित होण्याआधी देशात शांतता निर्माण होणं जास्त गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं. याआधी जून महिन्यात लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीदेखील अंतर्गत शांततेबद्दल महत्त्वपूर्ण विधान केलं होतं. 'आम्ही अडीच आघाड्यांवरील आव्हानांसाठी सज्ज आहोत,' असं रावत म्हणाले होते. पाकिस्तान, चीन या दोन आणि देशांतर्गत प्रश्न या आघाड्यांच्या संदर्भानं त्यांनी हे विधान केलं होतं. आपण चीनचं आव्हान समोर ठेवून तयारी करायला हवी, असं अरुण प्रकाश म्हणाले. 'चीनला आता एकही गोळी झाडण्याची गरज नाही. कारण भारताला घायाळ करण्याचे अनेक मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळेच आता चीनचं आव्हान मोडून काढण्याच्या उद्देशानं आपण सज्ज व्हायला हवं. आपण चीनशी दोन हात करण्याची तयारी केली, तर पाकिस्तानचं आव्हान असणार नाही,' असं प्रकाश म्हणाले. यावेळी माजी नौदलप्रमुखांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचं कौतुक केलं. यामुळे जम्मू-काश्मीरचा आर्थिक विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चीन वैज्ञानिक प्रगती साधतोय अन् आपण मंदिर, मशिदीवर वेळ घालवतोय- माजी नौदलप्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 09:10 IST