नवी दिल्ली : गेल्या मे महिन्यात ऑपरेशन सिंदूरनंतरच्या भारत आणि पाकिस्तानी सैन्यात झालेल्या चार दिवसांच्या संघर्षाचा चीनने एखाद्या प्रयोगशाळेप्रमाणे वापर केला. या युद्धात चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवून ती भारताविरुद्ध वापरायला लावली. अशा रितीने एकप्रकारे या शस्त्रांची चीनने चाचणी घेतली. त्या देशाने युद्धात पाकिस्तानला सर्व प्रकारची मदत केली असे भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी शुक्रवारी सांगितले.
ते म्हणाले की, इतरांच्या हातून शत्रूचा नाश करणे ही प्राचीन नीती चीनने वापरण्याचा प्रयत्न केला. ७ ते १० मे रोजी झालेल्या संघर्षात पाकिस्तान हा फक्त मुखवटा होता. या युद्धात पाकिस्तान हा फक्त मुखवटा होता. चीनने थेट युद्धात न उतरता पाकिस्तानला सर्व सहकार्य केले होते.
सिंग म्हणाले की, पाकिस्तानकडे असलेल्या शस्त्रास्त्रांपैकी ८१ टक्के शस्त्रास्त्रे चिनी बनावटीची आहेत. चीन स्वतः थेट संघर्ष न करता पाकिस्तानचा वापर करून भारताला त्रास द्यायचा प्रयत्न करतो. युद्धाच्या काळात पाकिस्तानने वापरलेली ड्रोन तुर्कस्थान व चिनी बनावटीची होती, असे समोर आले आहे.
तिबेट मुद्दा : भारताने संयमाने बोलावे : चीन
दलाई लामा यांचा उत्तराधिकारी त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार ठरवावा, या केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी केलेल्या वक्तव्यावर चीनने तीव्र आक्षेप घेतला आहे.
तिबेटशी संबंधित मुद्द्यांवर भारताने संयम राखून वक्तव्य करावे, असे चीनने म्हटले आहे. त्यावर श्रद्धा व धर्म या विषयात केंद्र सरकार कोणतीही भूमिका घेत नाही असे परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.
चीन, पाकचे आव्हान; संसदेत चर्चा करा : काँग्रेस
चीन आणि पाकिस्तानकडून भारतासमोर निर्माण केल्या जाणाऱ्या भू-राजकीय आणि आर्थिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी संसदेत भारत - चीन संबंधांवर चर्चा व्हायला हवी आणि त्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने होकार द्यावा, असे काँग्रेसने म्हटले .सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, भारतासमोर चीन व पाकचे आव्हान उभे आहे, त्यावर आगामी अधिवेशनात चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेस लावून धरणार आहे.