चीन सीमेलगत नव्या ५४ चौक्या
By Admin | Updated: October 25, 2014 08:32 IST2014-10-25T08:32:01+5:302014-10-25T08:32:55+5:30
सीमा भागातील विकासकामांवर चीनने आक्षेप घेतला असतानाच भारताने त्याला भीक न घालता सीमेलगत ५४ नव्या चौक्या उभारण्याची घोषणा केली आहे.

चीन सीमेलगत नव्या ५४ चौक्या
ग्रेटर नोएडा : सीमा भागातील विकासकामांवर चीनने आक्षेप घेतला असतानाच भारताने त्याला भीक न घालता सीमेलगत ५४ नव्या चौक्या(बॉर्डर आऊटपोस्ट) उभारण्याची तसेच चीनने कायम वाद उभा केलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये पायाभूत सुविधांसाठी १७५ कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलाच्या ५३ व्या स्थापनादिनी शुक्रवारी ही घोषणा केली. चीनसोबतचा सीमावाद चर्चेतून सोडविण्याची भारताची इच्छा आहे. सन्मानासह शांतता हेच भारताचे धोरण असून चीन आणि अन्य शेजारी देशांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यावर आमचा भर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताला चीनसोबत शांतता हवी आहे त्यासाठी देशाच्या सन्मानाची किंमत चुकवली जाणार नाही.'हम लोग शांती चाहते है सन्मान के साथ, असन्मान के साथ शांती नही हो सकती' असे सांगत त्यांनी अलीकडील चीनच्या सीमेवरील तणावाचा संदर्भ दिला. आत्मसन्मान ही सर्वांशी निगडीत बाब आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शेजारी देशांशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याची आणि सीमावाद शांततेने सोडविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सीमेबद्दल वाद असेल तर त्याबाबत चर्चा करावी, असे त्यांनी चीनच्या अध्यक्षांना सांगितले आहे. चीनने नेहमीच सीमेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. भारताला आपल्या हद्दीत पायाभूत सेवा द्यायच्या आहेत.