सहारनपूर दंगलीसाठी मुख्यमंत्री जबाबदार - भाजप
By Admin | Updated: July 27, 2014 13:10 IST2014-07-27T13:10:15+5:302014-07-27T13:10:29+5:30
उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथील दंगलीसाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव जबाबदार असून जातीय तणाव निर्माण करुन सत्ताधा-यांना व्होट बँकेचे राजकारण करायचे आहे असा आरोप भाजपने केला आहे.

सहारनपूर दंगलीसाठी मुख्यमंत्री जबाबदार - भाजप
ऑनलाइन टीम
सहारनगपूर, दि. २७ - उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथील दंगलीसाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव जबाबदार असून जातीय तणाव निर्माण करुन सत्ताधा-यांना व्होट बँकेचे राजकारण करायचे आहे असा आरोप भाजपने केला आहे. अखिलेश यादव सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरत असल्याची टीकाही भाजप नेते शाहनवाझ हुसैन यांनी केली आहे.
सहारनपूर येथे जमिनीशी निगडीत वादातून शनिवारी दोन समाजात दंगल भडकली होती. या दंगलीत तिघांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. तणावामुळे सहारनपूर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी दंगलीप्रकरणी २४ जणांना अटक केली असून संशयीतांची चौकशीही सुरु आहे. रविवारी सकाळपासून सहारनपूर येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी संध्या तिवारी म्हणाले, संचारबंदी शिथील करण्याचा अद्याप कोणताही विचार नसून शांतता कायम राहल्यास अधिका-यांशी याविषयावर चर्चा करु. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, या दंगलीवरुन राजकारणही सुरु झाले आहे. समाजवादी पक्षाने दंगलीसाठी भाजपला जबाबदार ठरवले आहे. तर भाजप नेते शाहनवाझ हुसैन यांनी सत्ताधारी समाजवादी पक्षाला दंगलीसाठी जबाबदार ठरवले आहे. हुसैन म्हणाले, उत्तरप्रदेशमधील सत्ताधा-यांना व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी जातीय तणाव निर्माण करायचा आहे. तर काँग्रेस नेते रशिद अल्वी यांनी उत्तरप्रदेशचे विभाजन करावे अशी मागणी केली आहे.