केजरीवाल बिनखात्याचे मुख्यमंत्री!
By Admin | Updated: February 15, 2015 01:38 IST2015-02-15T01:38:57+5:302015-02-15T01:38:57+5:30
विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयाचे शिल्पकार अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची दुसरी ‘इनिंग्ज’ही जगावेगळ््या पद्धतीने सुरू केली.

केजरीवाल बिनखात्याचे मुख्यमंत्री!
दिल्लीवर ‘आप’लं राज्य : जनसागराच्या साक्षीने शपथविधी
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयाचे शिल्पकार अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची दुसरी ‘इनिंग्ज’ही जगावेगळ््या पद्धतीने सुरू केली. स्वत:कडे एकही खाते न ठेवणारे केजरीवाल देशातील पहिले बिनखात्याचे मुख्यमंत्री झाले!
ऐतिहासिक रामलीला मैदानावर हजारोंच्या साक्षीने झालेल्या दिमाखदार सोहळ््यात नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केजरीवाल यांच्या सप्तप्रधान मंडळास पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात मुख्यमंत्री केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याखेरीज असीम अहमद खान, संदीप कुमार, सत्येंद्र जैन, गोपाल राय व जितेंद्र सिंग तोमर यांचा समावेश आहे. सिसोदिया यांनी सायंकाळी खातेवाटप जाहीर केले. त्यात केजरीवाल यांच्याकडे कोणतेही खाते नाही. सर्व मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेवणे, सरकारचा कारभार तत्पर करणे आणि जनतेशी संपर्कात राहणे ही तीन कामे मुख्यमंत्री केजरीवाल करतील.
क्रोसिन घेऊन आले... केजरीवाल यांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून ताप आहे. शपथ घेण्यासाठी रामलीला मैदनावर जातानाही ते क्रोसिनची गोळी घेऊन गेले होते. त्यांनी स्वत: भाषणात हे सांगितले.
पदभार स्वीकारला : नवनियुक्त मुख्यमंत्री केजरीवाल व त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य शपथविधी समारंभानंतर थेट सचिवालयात पोहोचले आणि आपापल्या पदाची सूत्रे स्वीकारली. येथे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळ सहकाऱ्यांसोबत चर्चाही केली. या चर्चेत भविष्यातील डावपेचांबाबत विचारविनिमय झाल्याचे समजते.
देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य
येत्या पाच वर्षांत राजधानी दिल्लीतील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करून दिल्लीला देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य बनविण्याची ग्वाही दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिली. जनसेवेसाठी २४ तास काम, व्हीआयपी संस्कृती संपविणे अणि दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा मानसही त्यांनी या वेळी व्यक्त केला. शपथविधीस उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमाची एक यादीच सादर केली.