नवी दिल्ली - आज हायड्रोजन बॉम्ब नाही, तो लवकरच येणार आहे. हे आणखी एक मतचोरीचं उदाहरण आहे. पुराव्यासह मतदार यादीतून कशारितीने नावे काढली गेली हे सांगत आहोत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मतचोरांचे संरक्षण करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत आमच्याकडे मतदार वगळले जात आहेत असा रिपोर्ट येत होता. काँग्रेसचे, विरोधकांचे मतदार यादीतून काढले जात होते. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक मतदार यादीतून काढले जातात. जी नावे यादीतून वगळली जातात ती विरोधकांची असतात असा आरोप करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, कर्नाटकात आळंद मतदारसंघात ही मतचोरी योगायोगाने पकडली गेली. त्याठिकाणचे BLO होते त्यांच्या नातेवाईकाचे नाव मतदार यादीतून काढले होते. माझ्या नातेवाईकाचं नाव मतदार यादीतून कुणी वगळले याचा तपास बीएलओने केला, तेव्हा शेजाऱ्याने हे नाव डिलिट केले असं समजले. त्यानंतर BLO ने जाऊन शेजाऱ्याला विचारले. त्याने मला काही माहिती नाही असं सांगितले. त्यानंतर संशय बळावला. त्यानंतर तपासाची प्रक्रिया सुरू केली. त्यात कुणी ना कुणी आळंदमधून मतदार यादीतून नियोजितपणे ही नावे काढत होते. ६ हजार मते यादीतून काढली, हा आकडा जास्तही असू शकतो परंतु ६ हजार नावे पकडली गेली आणि त्यावर तपास सुरू झाला असं त्यांनी सांगितले.
या तपासात ऑटोमॅटिकली मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी अर्ज दिले जात होते. मोबाईल नंबर कर्नाटकऐवजी दुसऱ्या राज्यांतील वापरले गेले. दुसऱ्या राज्यात बसून कर्नाटकतील मतदार यादीतून वगळली. टार्गेट करून काँग्रेस मतदारांची नावे काढली गेली. गोदाबाई यांच्या नावाने १२ मतदार यादीतून काढले गेले. त्यांना कल्पनाही नाही. यासाठी वापरलेले नंबर वेगवेगळ्या राज्यातील आहेत. या नंबरवर फोन केल्यानंतर रिप्लाय येत नाही. मग हे नंबर कुणाचे आहेत, कुणी चालवले, आयपी एड्रेस कोणता होता, ओटीपी जनरेट झाला, कुठे गेला हा प्रश्न कायम आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
त्याशिवाय सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने १४ मिनिटांत १२ नावे मतदार यादीतून वगळले. या सूर्यकांत यांना आम्ही विचारले असता, त्यांनी मी हे केलेच नाही. मी या लोकांना ओळखत नाही असं सांगितले. बबिता चौधरी यांचं नाव मतदार यादीतून काढले गेले. सूर्यकांत आणि बबिता यांना राहुल गांधी यांनी स्टेजवर बोलवले. काही नावे पहाटे ४ वाजता अर्ज करून डिलिट केले. निवडणूक आयोग झोपलंय का असा प्रश्न होता, पण नाही ते झोपले नव्हते. जे कुणी नावे डिलिट करत आहे त्यांचे मतदार यादीत क्रमांक नंबर वनला आहे. २०१८ च्या निवडणुकीत १० पैकी ८ बूथवर काँग्रेस पुढे होती. त्या ८ बुथवरील ६ हजार नावे डिलिट करण्यात आली असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
CID च्या १८ पत्राला एकदाही प्रतिसाद नाही
ज्ञानेश कुमार हे मतचोरांचे रक्षण करत आहे. मी जे काही बोलत आहे, ते पुराव्यासह बोलत आहे. कर्नाटक सीआयडीने गुन्हा दाखल केला. हे मतदार कोण आहेत, आयपी एड्रेस काय आहे, ओटीपी कुठे गेला याचा तपास सुरू होतो. कर्नाटक सीआयडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला १८ पत्रे दिली. आम्हाला ही माहिती द्या. मोबाईल नंबर द्या, त्यांचे लोकेशन सांगा पण १८ पत्राला एकही उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले नाही असंही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.