छत्तीसगडचे मुख्यमंत्री नक्षलींच्या मदतीने निवडणूका जिंकतात - दिग्विजय सिंह
By Admin | Updated: April 25, 2017 13:52 IST2017-04-25T13:44:59+5:302017-04-25T13:52:40+5:30
नेहमीच वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यावरुन धक्कादायक वक्तव्य केले आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री नक्षलींच्या मदतीने निवडणूका जिंकतात - दिग्विजय सिंह
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - नेहमीच वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यावरुन धक्कादायक वक्तव्य केले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असून नक्षलवाद्यांबरोबर तडजोड करुन भाजपाने तेथे विजय मिळवला आहे असे विधान दिग्विजय यांनी केले आहे.
सोमवारी दुपारी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले. दिग्विजय सिंह यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. सुकमामधील नक्षलप्रभावित भागामध्ये राहणा-या आदिवासी नागरीकांना विश्वासात घ्या. त्यांचा विश्वास संपादन केला तरच, तिथे प्रशासन चालवता येईल असे दिग्विजय म्हणाले.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जवानांवर झालेला हल्ला कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचं म्हणत जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही असा विश्वास त्यांनी दिला आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करताना राजनाथ सिंग संतप्त दिसत होते. नक्षलवाद्यांच्या समस्येला आपण एक आव्हान म्हणून स्विकारलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.