Shashi Tharoor on Cheteshwar Pujara : भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने आज क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३७ वर्षीय पुजाराने आपल्या कारकिर्दीत १०३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले. पुजाराने भारताकडून शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (२०२३) मध्ये खेळला होता. दरम्यान, पुजाराच्या निवृत्तीनंतर काँग्रेस नेते शशी थरुर यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. थरूर म्हणाले की, पुजारासारख्या हुशार कसोटी फलंदाजाला सन्मानपूर्वक निरोप द्यायला हवा होता.
शशी थरूर यांनी X वर लिहिले की, "चेतेश्वर पुजाराची निवृत्ती मनाला वेदना देणारी आहे. त्याला अलीकडच्या काळात टीम इंडियामधून वगळण्यात आले. त्याच्याकडे सिद्ध करण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते. त्यामुळे त्याचा हा निर्णय जवळजवळ निश्चित झाला होता. मात्र, असे असले तरी त्याच्या शानदार कसोटी कारकिर्दीला सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता."
त्याने धाडस दाखवले अन् देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतलाथरूर पुढे लिहितात, "जेव्हा त्याला संघातून वगळण्यात आले, तेव्हा त्याने धाडस दाखवले आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतून अनेक शानदार खेळी खेळल्या. परंतु निवडकर्त्यांनी आधीच पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत पुजाराची निवृत्ती चुकीची म्हणता येणार नाही. मी त्याच्या पत्नीचे (पूजा पुजारा) 'द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ' हे पुस्तक वाचले आणि पुजाराकडे जे आहे, ते साध्य करण्यासाठी किती वेळ लागतो, याचा विचार केला. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या दौऱ्यात त्याची खूप आठवण आली. चेतेश्वर पुजाराला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आणि वर्षानुवर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केल्याबद्दल धन्यवाद," अशी पोस्ट थरुर यांनी केली.
पुजाराची कारकीर्दचेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये ७१९५ धावा केल्या आहेत. यात त्याने १९ शतके आणि ३५ अर्धशतके केली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराची सरासरी ४३.६० होती. तर, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पुजाराने फक्त ५१ धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुजाराने सौराष्ट्र आणि पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व केले. पुजाराने नॉटिंगहॅमशायर, यॉर्कशायर आणि ससेक्ससाठी काउंटी क्रिकेट देखील खेळले आहे.