Air India Plane Crash: अहमदाबादमधील विमान अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सर्व विमान कंपन्यांना आता नवीन सूचना जारी केल्या आहेत. गेल्या आठवड्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग सिस्टमचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर आता फ्युएल कंट्रोल स्विचबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. देशात कार्यरत असलेल्या बोईंगसह इतर विमानांच्या फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग सिस्टमची तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
एअर इंडिया विमान अपघाताच्या अहवालात फ्युएल कंट्रोल स्विचचा उल्लेख करण्यात आला होता. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानाच्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा उड्डाणानंतर अवघ्या तीन सेकंदात थांबला. विमानाचे फ्युएल कंट्रोल स्विच काही सेकंदांच्या कालावधीत रनवरून कटऑफवर गेले होते. त्यामुळे फ्युएल कटऑफ स्विच बंद असल्याने इंधन इंजिनपर्यंत पोहोचू शकले नाही आणि वैमानिकांना टेकऑफ करता आलं नाही. त्यामुळे आता डीजीसीआयने सर्व विमानांच्या फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग सिस्टमची तपासणी करण्यास सांगितले आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा प्रारंभिक तपास अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर डीजीसीआयने विमान कंपन्यांना हे आदेश दिलेत. ही चौकशी २१ जुलै २०२५ पर्यंत पूर्ण करायची आहे. स्टेट ऑफ डिझाईन/मॅन्युफॅक्चरने जारी केलेल्या एअरवर्थिनेस निर्देशांनुसार ही तपासणी अनिवार्य केली जात आहे. डीजीसीएने त्यांच्या आदेशात म्हटले आहे की अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान ऑपरेटर्सनी सूचनांनुसार त्यांच्या विमानांची तपासणी सुरू केली आहे. एअरलाइन ऑपरेटर्सना २१ जुलैपर्यंत त्यांची चौकशी पूर्ण करण्यास सांगितले आहे.
एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ विमानाच्या अपघाताबाबत एएआयबीने शनिवारी आपला प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता. १२ जून रोजी झालेल्या या अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला होता. अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे फ्लाइट क्रमांक एआय-१७१ हे विमान टेकऑफनंतर क्षणात कोसळले आणि एका इमारतीवर आदळले. 'कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग'मध्ये एका पायलटने दुसऱ्याला इंधन का बंद केले असे विचारले, तर को पायलटने मी तसे केले नाही असं म्हटलं. त्यामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा होऊ शकला नाही आणि अवघ्या ३२ सेकंदात तो अपघातात सापडला.