‘चरखा चालवून स्वातंत्र्य मिळाले नाही’
By Admin | Updated: March 18, 2015 23:50 IST2015-03-18T23:50:15+5:302015-03-18T23:50:15+5:30
देशात धार्मिक असहिष्णुता वाढली असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असताना विश्व हिंदू परिषदेचे नेते मात्र सातत्याने वादग्रस्त विधाने करून केंद्रातील मोदी सरकारच्या अडचणी वाढवीत आहेत.

‘चरखा चालवून स्वातंत्र्य मिळाले नाही’
लखनौ : देशात धार्मिक असहिष्णुता वाढली असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असताना विश्व हिंदू परिषदेचे नेते मात्र सातत्याने वादग्रस्त विधाने करून केंद्रातील मोदी सरकारच्या अडचणी वाढवीत आहेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे ब्रिटिशांचे एजंट होते, असा आरोप करून विहिंपच्या साध्वी प्राची यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. भारताला केवळ चरखे चालवून स्वातंत्र्य मिळालेले नाही, तर वीर सावरकर व भगतसिंग यांच्यासारख्या शूर पुत्रांच्या बलिदानाने हा देश मुक्त होऊ शकला, असेही वक्तव्य त्यांनी केले. उत्तर प्रदेशच्या बहरीच जिल्ह्यात मंगळवारी हिंदू संमेलनात मार्गदर्शन करताना साध्वींनी पुन्हा एकदा आपले कटू विचार मांडले. भारत माता की जय व वंदे मातरम् म्हणण्यास नकार देणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. तसेच गायींची कत्तल करणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असेही मत त्यांनी मांडले. (वृत्तसंस्था)
यापूर्वीही अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले होते.
भारतीय नागरिकाला मग तो हिंदू असो वा मुस्लिम, दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना सरकारी सुविधांपासून वंचित ठेवले जावे, अशी मागणी करीत त्यांनी ‘हम दो हमारो दो’ चा नारा लावला.
विशेष म्हणजे साध्वी प्राची यांनी यापूर्वी हिंदूंना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते.