एसबीआय कार्डद्वारे आता चेक व्यवहारांवर आकारलं जाणार शुल्क
By Admin | Updated: April 18, 2017 17:02 IST2017-04-18T17:02:05+5:302017-04-18T17:02:05+5:30
मोदींच्या या निर्णयानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं क्रेडिट कार्डनं करण्यात येणा-या इतर बँकांच्या चेक व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

एसबीआय कार्डद्वारे आता चेक व्यवहारांवर आकारलं जाणार शुल्क
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - गेल्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन व्यवहार करण्याचं नागरिकांना जोरदार आवाहन केलं होतं. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑनलाइन व्यवहारांवरील सेवाकरावरही काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र आता मोदींच्या या निर्णयानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं क्रेडिट कार्डनं करण्यात येणा-या इतर बँकांच्या चेक व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2 हजारांपेक्षा कमी रकमेचा चेक बँकेत टाकल्यानंतर तो वटवण्यासाठी तुमच्याकडून 100 रुपये शुल्क आकारणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे चेकच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना भुर्दंड पडणार आहे. क्रेडिट कार्डानं केलेल्या खरेदीचे पैसे चुकवण्यासाठी निर्धारित तारखेला ग्राहकांकडून बँकेत चेक जमा केले जातात. ब-याचदा पैसे भरण्याची तारीख निघून गेलेली असल्यानं विलंब शुल्क भरण्यावरून ग्राहक आणि बँक कर्मचा-यांमध्ये वाद होतात. याच पार्श्वभूमीवर चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारणार असल्याचे बँकेनं जाहीर केलं आहे. 2000 पेक्षा कमी रकमेचा चेक वटवण्यासाठी हे जास्तीचं हे शुल्क आकारलं जाणार आहे. मात्र तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असल्यास आणि एसबीआयच्याच चेकद्वारे पैसे भरल्यास तुम्हाला हे शुल्क लागू होणार नाही, असंही बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
एसबीआय कार्डची नोंदणी बँक म्हणून न होता फायनान्स कंपनी म्हणून झाली आहे. चेक वटवण्यासाठी ही कंपनी ग्राहकांकडून पैसे आकारते. बँकेच्या या निर्णयामुळे बिल भरणाऱ्यांना मोठा फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.