सोनिया आणि राहुल गांधींवरील आरोप खोटे
By Admin | Updated: December 13, 2015 22:35 IST2015-12-13T22:35:57+5:302015-12-13T22:35:57+5:30
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केले जात असलेले आरोप सपशेल खोटे, चिथावणीजनक आणि केवळ बदनामी करण्यापोटी हेतुपुरस्सर रचलेले आहेत,

सोनिया आणि राहुल गांधींवरील आरोप खोटे
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केले जात असलेले आरोप सपशेल खोटे, चिथावणीजनक आणि केवळ बदनामी करण्यापोटी हेतुपुरस्सर रचलेले आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि अश्विनीकुमार यांनी रविवारी स्पष्ट केले.
हेराल्ड खरेदी प्रकरणातील सर्व व्यवहार कायदेशीर असून, सोनिया आणि राहुल गांधी न्यायालयीन प्रक्रियेतून पूर्णपणे निर्दोष सिद्ध होतील. या व्यवहारात काहीही गैर नसून नुकसानीत असलेल्या कंपनीला सर्वाधिक शेअर देत या संपत्तीतील एकही रुपया खासगी लाभार्थ्यांकडे जाऊ नये, अशी दक्षता घेण्यात आली आहे, असे सांगत चिदंबरम यांनी असोसिएट जर्नल्स लिमिटेडचे (एजीएल) शेअर यंग इंडिया कंपनीकडे हस्तांतरित करण्याच्या व्यवहाराचे समर्थन केले. या कंपनीत सोनिया आणि राहुल गांधी हे मुख्य भागधारक आहेत.
बंद झालेले हे प्रकरण पुन्हा सुरू करताना मोदी सरकारने एका खासगी तक्रारीचा आधार घेताना घिसाडघाई केली आहे. एजीएलची संपत्ती आता दुप्पट सुरक्षित बनली आहे, असा दावाही चिदंबरम यांनी केला. काँग्रेस नेत्यांवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आणि बदनामीकारक आहेत. हा संपूर्ण व्यवहार कायदेशीररीत्या पार पडलेला आहे, असे अश्विनीकुमार यांनी एका निवेदनात स्पष्ट केले.