चॅपेल रिंगमास्टर होते - सचिननं आत्मचरीत्रात घेतलं तोंडसुख
By Admin | Updated: November 3, 2014 18:06 IST2014-11-03T18:06:19+5:302014-11-03T18:06:19+5:30
भारतीय क्रिकेट संघाचे कोच ग्रेग चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे अशी बोचरी टीका सचिन तेंडुलकरने आपल्या आत्मचरीत्रात केली आहे.

चॅपेल रिंगमास्टर होते - सचिननं आत्मचरीत्रात घेतलं तोंडसुख
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. - भारतीय क्रिकेट संघाचे कोच ग्रेग चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे अशी बोचरी टीका सचिन तेंडुलकरने आपल्या आत्मचरीत्रात केली आहे. प्लेइंग इट माय वे या आत्मचरीत्रात चॅपेल यांच्यावर एरवी मृदूभाषी असलेल्या सचिनने घणाघाती टीका केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. २००५मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झालेल्या ग्रेग चॅपेल यांची कारकिर्द चांगलीच वादळी ठरली होती. चॅपेल हे खेळाडूंवर आपल्या कल्पना लादायचे असा आरोपही सचिनने केला असल्याचे समजते.
याआधी चॅपेल आणि सौरभ गांगुली यांच्यातील वादविवाद अनेकवेळा चव्हाट्यावर आले होते आणि गांगुलीने चॅपेल यांच्यावर उघड हल्ला चढवला होता. त्यावेळी उघड कुठलीही टीका करण्याचे टाळलेल्या सचिनने आता मात्र आपले मनोगत आत्मचरीत्रात व्यक्त केले असून चॅपेल यांच्यावर टीका केली आहे. सचिनने कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करावी यासंदर्भातही चॅपेल यांनी आग्रही चुकीची भूमिका घेतल्याची टीका झाली होती आणि नंतर चॅपेल यांनी आपली ती चूक झाल्याची खंतही व्यक्त केली होती. चॅपेल यांना करायच्या असलेल्या बदलांना झहीर खान व हरभजन सिंग यांनीही विरोध केला होता आणि त्यांनी गांगुलीची पाठराखण केली होती. केवळ तुझी वागणूक मला आवडत नाही म्हणून कितीही चांगली कामगिरी केलीस तरी तुला मी संघातून काढेन अशा प्रकारची वागणूक आपल्याला मिळाल्याचा आरोप झहीरने चॅपेल यांच्यावर केला होता. सचिनच्या आत्मचरीत्रात याप्रमाणेच मॅच फिक्सिंगसारख्या व क्रिकेटमध्ये रुजलेल्या अन्य वाईट प्रथांवरही प्रकाश पडलेला आहे की केवळ अशा काही गोष्टीच आल्या आहेत हे लवकरच कळेल.