Chandrayaan-2 re-launch on July 22, 2019 - Indian Space Research Organisation | Chandrayaan-2: 'चांद्रयान-२' चा नवा मुहूर्त ठरला; २२ जुलैला दुपारी प्रक्षेपण
Chandrayaan-2: 'चांद्रयान-२' चा नवा मुहूर्त ठरला; २२ जुलैला दुपारी प्रक्षेपण

बंगळुरु : चांद्रयान -2 या अवकाशयानाचे 22 जुलै रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी पुनर्प्रक्षेपण होणार आहे. याबाबतची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे. जीएसएलव्ही मार्क 2 या प्रक्षेपकाच्या मदतीने गेल्या सोमवारी पहाटे झेपावणाऱ्या चांद्रयान-2 चे उड्डाण आयत्या वेळी उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले होते.


श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाशात झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचेल. झेप घेतल्यानंतर हे चांद्रयान 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. त्यानंतर, ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल. चांद्रयान-2 चे या आधी गेल्या सोमवारी प्रक्षेपण करण्याचा जो प्रयत्न झाला, त्यावेळी निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी इस्रोचे अभियंते व शास्त्रज्ञ कसोशीने प्रयत्न करत होते. आता हा तांत्रिक बिघाड दूर झाल्यामुळे 22 जुलै रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी चांद्रयान -2 चे पुनर्प्रक्षेपण होणार आहे.

दरम्यान, चांद्रयान-2 मोहिमेसाठी तीन मॉड्युल्स तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एक ऑर्बिटर, लँडर आणि एका रोव्हरचा समावेश आहे. त्यांना लाँच व्हेइकल जीएसएलव्ही एमके lll अंतराळात घेऊन जाईल. विशेष म्हणजे हे लाँच व्हेइकल भारतातच बनवण्यात आले आहे. चांद्रयान-2 च्या लँडरला विक्रम आणि रोव्हरला प्रज्ञान नाव देण्यात आले आहे. रोव्हर प्रज्ञानला लँडर विक्रमच्या आत ठेवण्यात येईल. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमचे लँडिंग झाल्यानंतर त्याला बाहेर आणले जाईल. 

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, ऑर्बिटर मोहिमेदरम्यान चंद्राभोवती भ्रमण करणार आहे. नंतर हे ऑर्बिटर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या पृष्टभागावर पोहोचल्यानंतर सहा चाके असलेला प्रज्ञान नाव असलेला रोव्हर पृष्टभागावर उतरेल. इस्रोचे शास्रज्ञ पृथ्वीवरून या रोव्हरचे नियंत्रण करणार आहेत. भारताच्या चांद्रमोहिमेला पुढे घेऊन जाण्याबरोबरच चांद्रयान-2 अंतराळ संस्थांची मदत देखील करणार आहे. 

भारताने 2009 मध्ये चांद्रयान-1 चंद्रावर पाठवले होते. मात्र त्यामध्ये रोव्हरचा समावेश नव्हता. आता दहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा भारताने चांद्र मोहीम हाती घेतली असून, चांद्रयान-2 चे आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे.

English summary :
Chandrayaan 2 Launch will take place on July 22 in the afternoon of midday 2.43 minutes. Indian Space Research Organization (ISRO) has informed about this. Chandrayaan 2 will reach the moon at 52 days after the arrival of Satish Dhawan Space Research Center in Sriharikota.


Web Title: Chandrayaan-2 re-launch on July 22, 2019 - Indian Space Research Organisation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.