Chandrayaan-2 is beginning of a historic journey, says isro chief k sivan | Chandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना
Chandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना

ठळक मुद्देइस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी चांद्रयान-२चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा केली'चांद्रयान-२'चं यशस्वी उड्डाण हा आपल्या तिरंग्याचा सन्मान आहे, अशा भावना व्यक्त केल्या.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या शास्त्रज्ञांचे त्यांनी मनापासून आभार मानले.  

तमाम भारतीयांसाठी आजचा दिवस अभिमानाचा, सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असाच आहे. दुपारी बरोब्बर २.४३ वाजता 'बाहुबली' नावाचं रॉकेट यानाला घेऊन अवकाशी झेपावलं आणि पुढच्या काही मिनिटांत त्यानं पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. त्यानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के सिवन यांनी उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा केली आणि सगळ्यांचाच ऊर भरून आला. 'चांद्रयान-२'चं यशस्वी उड्डाण हा आपल्या तिरंग्याचा सन्मान आहे, अशा भावना व्यक्त केल्या. आता पुढच्या मोहिमेची तयारी सुरू करणार असल्याचं सिवन यांनी जाहीर केलं, तेव्हा इस्रोबद्दलचा आदर दुणावला. 

'भारताने दुसऱ्या चांद्रमोहीमेसाठी घेतलेली झेप ही ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात आहे. आजवर जे अज्ञात आहे त्याचा शोध घेण्याचा हा प्रवास आहे', असं सिवन म्हणाले. गेला आठवडाभर दिवसरात्र एक करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या शास्त्रज्ञांचे त्यांनी मनापासून आभार मानले.  


गेल्या रविवारी - १५ जुलैला मध्यरात्री 'चांद्रयान-२' अवकाशी झेपावणार होतं. परंतु, अगदी शेवटच्या क्षणी तांत्रिक कारणामुळे हे उड्डाण स्थगित करावं लागलं होतं. इस्रोच्या शास्रज्ञांनी चिकाटीनं यानातील त्रुटी दुरुस्त केली आणि आज या वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमांचं चीज झालं. चांद्रयान-२च्या भरारीमुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता ६ सप्टेंबरला हे यान चंद्रावर उतरेल.  
या यशस्वी उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी टाळ्या वाजवून, शेकहँड करून आणि सहकाऱ्यांची गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला. त्यावेळी आपल्या यशोगाथेबद्दल बोलताना के सिवन यांचा कंठही दाटून आला होता. घर-दार विसरून, वैयक्तिक सुख-दुःख बाजूला ठेवून प्रत्येक वैज्ञानिक अविश्रांत झटला आहे. गेले सात दिवस तर प्रत्येकानेच झपाटल्यागत काम केलं. तांत्रिक बिघाड दुरुस्त केला. त्याच जोरावर आज आपण चंद्राच्या दिशेनं ऐतिहासिक प्रवास सुरू केला आहे, अशा भावना सिवन यांनी व्यक्त केल्या. आजचा दिवस फक्त इस्रो किंवा भारतासाठीच नव्हे, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विश्वासाठीही गौरवाचा आहे. आम्हाला भारताचा झेंडा यापुढेही उंचच उंच फडकवत ठेवायचा आहे, असंही त्यांनी नमूद केलं.  


चांद्रयान-२ चं प्रक्षेपण आणि के सिवन यांचं भाषणः
 


Web Title: Chandrayaan-2 is beginning of a historic journey, says isro chief k sivan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.