नक्षलग्रस्त भागात मतदानाचे आव्हान
By Admin | Updated: September 23, 2014 05:04 IST2014-09-23T05:04:58+5:302014-09-23T05:04:58+5:30
नक्षलग्रस्त जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान राहणार आहे.

नक्षलग्रस्त भागात मतदानाचे आव्हान
गडचिरोली : नक्षलग्रस्त जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान राहणार आहे. नक्षलवाद्यांचा लोकशाही प्रक्रियेला विरोध असून, त्यांनी यावेळी मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात ही पत्रके वाटली जात आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागात मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
दुसरीकडे प्रशासनाने नक्षलग्रस्त भागात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवली असून मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. आरमोरी, अहेरी, गडचिरोली विधानसभा मतदार संघांमध्ये एकूण ८९३ मतदान केंद्र आहेत. यापैकी १८३ अतिसंवेदनशील आहेत. तर २३४ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांमध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रातील ६१, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील २५ व अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वाधिक ९७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांवर गडचिरोली पोलीस दलाचे शेकडो जवान, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल यांचेही तेवढेच जवान तैनात करावे लागतात. मतदान केंद्रापासून १५ ते २० किमीवरून मतदारांना येथे मतदानासाठी आणावे लागते. यंदा गडचिरोली प्रशासनाने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनाचीही व्यवस्था केली आहे.