दिल्लीपुढे बेंगळुरूचे आव्हान

By Admin | Updated: May 13, 2014 05:13 IST2014-05-13T05:13:52+5:302014-05-13T05:13:52+5:30

दमदार स्थितीत असल्यानंतरही गेल्या लढतीत पराभव स्वीकारणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आयपीएलच्या सातव्या पर्वात मंगळवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

Challenge Bangalore ahead of Delhi | दिल्लीपुढे बेंगळुरूचे आव्हान

दिल्लीपुढे बेंगळुरूचे आव्हान

बेंगळुरू : दमदार स्थितीत असल्यानंतरही गेल्या लढतीत पराभव स्वीकारणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आयपीएलच्या सातव्या पर्वात मंगळवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बेंगळुरू संघ संघर्ष करीत असलेल्या दिल्लीविरुद्ध विजय मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. स्टिव्हन स्मिथ (४८ धावा, २१ चेंडू) आणि जेम्स फॉकनेर (४१ धावा, १७ चेंडू) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत बेंगळुरू संघाचा पराभव केला. दिल्ली डेअरडेव्हिल्सला यापूर्वीच्या लढतीत कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू संघात स्टार खेळाडूंचा समावेश असला तरी, त्यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. नऊ सामन्यांत सहा पराभव स्वीकारणारा बेंगळुरू संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दुसर्‍या बाजूचा विचार करता आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दिल्ली संघ (२ विजय व ७ पराभव) तळाच्या स्थानावर आहे. राजस्थानविरुद्ध ३८ चेंडूंमध्ये ८३ धावांची खेळी करीत युवराजसिंगने सूर गवसल्याचे सिद्ध केले आहे. युवराजला १४ कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आले आहे. ख्रिस गेल व विराट कोहली यांचा फॉर्म बेंगळुरू संघासाठी चिंतेचा विषय आहे. गेलला या स्पर्धेत अद्याप छाप सोडता आलेली नाही. उर्वरित पाच सामन्यात गेल चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे. बेंगळुरू संघातर्फे एबी डिव्हिलियर्सने कामगिरीत सातत्य राखले आहे. डिव्हिलियर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ५३ धावांची तर राजस्थानविरुद्ध ५८ धावांची खेळी केली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Challenge Bangalore ahead of Delhi