आंदोलकांची मुस्कटदाबी करण्याचे केंद्राचे प्रयत्न
By Admin | Updated: August 5, 2015 23:14 IST2015-08-05T23:14:10+5:302015-08-05T23:14:10+5:30
पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’चे (एफटीआयआय) नवनियुक्त अध्यक्ष गजेन्द्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात

आंदोलकांची मुस्कटदाबी करण्याचे केंद्राचे प्रयत्न
नवी दिल्ली : पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’चे (एफटीआयआय) नवनियुक्त अध्यक्ष गजेन्द्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन उभारणाऱ्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सरकारकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप केला. आमचे आंदोलन कमजोर पडावे यासाठी विद्यार्थ्यांच्या ‘चारित्र्यहननासह’ अनेक प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला.
गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदावरील नियुक्तीस विरोध करीत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी गत १२ जूनपासून आंदोलन उभारले आहे. आंदोलनास ५५ दिवस होऊनही सरकारने संवादासाठी कुठलाही पुढाकार न घेतल्याने एफटीआयआयचे विद्यार्थी दिल्लीत धडकले आहेत. बुधवारी पत्रपरिषदेत बोलताना आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सरकारवर अनेक आरोप केले.
आमच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सरकारद्वारे आम्हाला राष्ट्रविरोधी आणि हिंदूविरोधी ठरवले जात आहे. आमचे चारित्र्यहनन सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका मुखपत्रात आम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत संबोधण्यात आले आहे. हे अत्यंत निराशाजनक आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)