सेन्सॉरने अडविलेल्या माहितीपटाचा ट्रेलर फेसबुकवर
By Admin | Updated: July 16, 2017 23:35 IST2017-07-16T23:35:09+5:302017-07-16T23:35:09+5:30
नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपट सेंसॉर बोर्डाने अडविला असला तरी दिग्दर्शक सुमन घोष

सेन्सॉरने अडविलेल्या माहितीपटाचा ट्रेलर फेसबुकवर
कोलकता : नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपट सेंसॉर बोर्डाने अडविला असला तरी
दिग्दर्शक सुमन घोष यांनी या माहितीपटाचा ट्रेलर फेसबुकवर अपलोड केला आहे.
‘द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ असे माहितीपटाचे नाव आहे. पहलाज निहलानी यांच्या नेतृत्वाखालील सेंसॉर बोर्डाने या माहितीपटातील ‘काऊ’ (गाय), ‘गुजरात’, हिंदुत्व, आणि ‘हिंदू इंडिया’ या चार शब्दांवर आक्षेप घेतला आहे. हे शब्द वगळल्याशिवाय माहितीपटाला परवानगी मिळणार नाही, अशी भूमिका निहलानी यांनी घेतली आहे. माहितीपटाच्या ट्रेलरलाही त्यांनी परवानगी नाकारली आहे. त्याचे कुठल्याही प्रकारचे प्रसारण केले जाऊ शकत नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
तरीही दिग्दर्शक सुमन घोष यांनी निहलानी यांचे आदेश झुगारून चित्रपटाचे ट्रेलर फेसबुकवर अपलोड केला आहे. घोष यांनी आपल्या फेसबुक पेजवर काल टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमचा ‘ द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ हा माहितीपट १४ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. तथापि, आम्हाला त्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्ही ट्रेलरही तयार केला होता. आवडल्यास तो शेअर करा.
घोष यांनी आम्हाला संपूर्ण देशातून लोकांचा आणि मीडियाचा पाठिंबा मिळत आहे. त्याबद्दल मी ऋणी आहे, असेही म्हटले आहे.