घटस्फोटाचं सेलिब्रेशन करत वाटली 50 किलो मिठाई
By Admin | Updated: April 25, 2017 13:40 IST2017-04-25T13:40:03+5:302017-04-25T13:40:03+5:30
राजकोटमधील एका व्यवसायिकासाठी आपल्या लग्नाचा शेवट म्हणजे एक आनंदाचा क्षण होता

घटस्फोटाचं सेलिब्रेशन करत वाटली 50 किलो मिठाई
>ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 25 - घटस्फोट म्हटलं की अनेकांवर दुखाचा डोंगर कोसळलेला असतो. मग अशावेळी दर्दभरी गाणी ऐकणे, एकट्याने रडत बसून आपलं दुख: हलकं करण्याचा प्रयत्न करणे अशा गोष्टी सुरु होतात. पण राजकोटमधील एका व्यवसायिकासाठी आपल्या लग्नाचा शेवट म्हणजे एक आनंदाचा क्षण होता. एवढंच कशाला आपला हा आनंद आपल्यापुरता मर्यादित न ठेवता महाशयांनी सगळ्या मित्र आणि नातेवाईकांमध्ये 50 किलो मिठाई वाटली.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार 26 वर्षीय रिंकेश आपल्या मित्र आणि नातेवाईकांना काजू बर्फीचे बॉक्स पाठवत आहेत. त्यावर त्यांनी घटस्फोटाचं सेलिब्रेशन असं लिहिलंदेखील आहे. मिठाईंच्या या बॉक्समध्ये महिला आपल्या हक्कांचा कसा गैरवापर करत आहेत यासंबंधी एक चिठ्ठीदेखील लिहिण्यात आली आहे.
15 एप्रिल रोजी रिंकेशचा घटस्फोट झाला. तेव्हापासून आपला फोन सतत वाजत असून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचं त्याने सांगितलं आहे. "अनेक पुरुषांनी फोन करुन तुमचा आनंद समजू शकतो अशी प्रतिक्रिया दिली. अनेकांना महिलांच्या बाजूने कायदा झुकला असताना कशाप्रकारे प्रक्रियेला सामोरे गेलात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. अनेक महिलांनीही मला फोन करुन त्यांच्या सुनेसोबत घडलेले भयंकर किस्से सांगितले", असं रिंकेश सांगतो.
विशेष म्हणजे हे सर्व जाहीर करत असताना त्याने कुठेही आपल्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला नाही. "आपल्या कुटुंबापासून वेगळं राहण्याची इच्छा तिने व्यक्त केली तेव्हाच हे प्रकरण सुरु झालं. मी घटस्फोटासाठी अर्ज केला तेव्हाच मला महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्याची माहिती मिळाली. घटस्फोट घेताना तिने मागितलेली रक्कम माझ्या आवाक्याबाहेर होती, त्यामुळे यासाठी दोन वर्ष लागली", अशी माहिती रिंकेशने दिली आहे.
ही आपल्या आयुष्यातील एक पायरी असल्याचं म्हणत रिंकेशने पुन्हा लग्न करण्याची तयारी दर्शवली आहे.