भारत पाकिस्तान यांच्यात झालेली शस्त्रसंधी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शस्त्रसंधीतील चर्चेतील सहभाग, तुर्कीसोबतचे तणावपूर्ण संबंध या आणि याच्याशी संबंधित मुद्द्यांवर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी संसदेच्या स्थायी समितीसमोर महत्त्वाची माहिती सादर केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीबद्दल केलेला दावाही परराष्ट्र सचिवांनी फेटाळून लावला. या बैठकीत संसदीय समितीने विक्रम मिस्री यांना ट्रोल करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संसदेच्या स्थायी समितीची परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत विक्रम मिस्री यांनी शस्त्रसंधीबद्दल अनेक महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली का?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय समितीत असलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी विचारले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी सात वेळ शस्त्रसंधी करण्यात मध्यस्थी केल्याचा दावा केला. मग भारत सरकार त्यांना वारंवार पुढे येण्याची संधी का देत आहे? एका सदस्याने असा मुद्दा उपस्थित केला की, डोनाल्ड ट्रम्प सतत काश्मीर मुद्द्याचा उल्लेख का करत आहे आणि सरकार का गप्प बसले आहे?
मिस्रींनी संसदीय समितीला सांगितले की, 'भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी पूर्णपणे दोन्ही देशातच झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यामध्ये कोणतेही तथ्य नाहीये. ट्रम्प यांनी शस्त्रसंधीमध्ये येण्यासाठी आमची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यांना यात यायचे होते, आणि ते आले.'
पाकिस्तानसोबतचे संबंध सुरूवातीपासूनच खराब
विक्रम मिस्री संसदीय समितीला म्हणाले, '१९४७ पासूनच आपले पाकिस्तानसोबतचे संबंध चांगले नाहीत. दोन्ही देशातील डीजीएमओंमध्ये सातत्याने संवाद होत राहिला आहे. त्याचबरोबर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पारंपरिक शस्त्रांपर्यंतच मर्यादित राहिलेला आहे आणि पाकिस्तानकडून कोणतीही अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी मिळालेली नाही.'
तुर्कीबद्दल विक्रम मिस्रींनी समितीला काय सांगितले?
'भारताचे तुर्कीसोबत कधीही वाईट संबंध राहिलेले नाहीत. पण, दोन्ही देश कधीही जवळचे सहकारी राहिलेले नाहीत. कोणत्याही संघर्षामध्ये तुर्कीसोबतच्या व्यापाराबद्दल कोणताही उल्लेख नाहीये', असेही मिस्री यांनी सांगितले.