सीबीएसई दहावीची परीक्षा पुन्हा सुरू करणार?
By Admin | Updated: October 22, 2016 01:09 IST2016-10-22T01:09:44+5:302016-10-22T01:09:44+5:30
सहा वर्षांपूर्वी बंद केलेली सीबीएसई दहावीची बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा बंद केल्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची चिंता व्यक्त होत होती.

सीबीएसई दहावीची परीक्षा पुन्हा सुरू करणार?
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
सहा वर्षांपूर्वी बंद केलेली सीबीएसई दहावीची बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा बंद केल्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची चिंता व्यक्त होत होती.
निर्णय घेण्यात आलेला नाही; परंतु आम्हाला पुन्हा परीक्षा सुरू करायची आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. पाच राज्यांचे मंत्री व पालकांनी परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी केलेली आहे. तथापि, संबंधित वर्गांमधून परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत तरी त्यातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा चांगला असावा, असे सरकारचे मत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या २५ आॅक्टोबर रोजीच्या बैठकीत होईल. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, शिक्षणतज्ज्ञ व पालकांच्या संघटनांनी याबाबत निवेदने पाठवली आहेत. त्यात म्हटले आहे की, परीक्षा बंद करण्याच्या तसेच नापास न करण्याच्या धोरणामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत आहे. याबरोबरच असे विद्यार्थी पुढे बारावीची बोर्ड परीक्षेचे थेट आव्हान पेलण्यास असमर्थ ठरत असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवरही होत आहे. करिअर ठरवण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्यामुळे नवीन निर्णय होण्याची शक्यता आहे. परीक्षा नेमकी कधी सुरू करायची, याबाबत मतैक्य झालेले नाही; परंतु २०१८ मध्ये हा निर्णय लागू होऊ शकतो.
सीबीएसई दहावीची परीक्षा २०१० मध्ये बंद करण्यात आली होती व त्याजागी सतत आणि समग्र मूल्यांकन (सीसीई) प्रणाली लागू करण्यात आली होती. त्याअंतर्गत संपूर्ण वर्षभर विविध चाचण्यांच्या आधारे ग्रेड देण्यात येत होते. आठवीपर्यंत नापास न करण्याच्या निर्णयातही सुधारणा करण्याचा विचार सुरू आहे. पाचवीपर्यंतच हा निर्णय लागू करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.