रवी यांच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी?
By Admin | Updated: March 20, 2015 01:34 IST2015-03-20T01:34:42+5:302015-03-20T01:34:42+5:30
कर्नाटकमधील कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी ३५ वर्षीय डी. के. रवीकुमार यांच्या संशयास्पद मृत्यूच्या मुद्यावरून गुरुवारी लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला.

रवी यांच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी?
नवी दिल्ली : कर्नाटकमधील कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी ३५ वर्षीय डी. के. रवीकुमार यांच्या संशयास्पद मृत्यूच्या मुद्यावरून गुरुवारी लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला. भाजप व काँग्रेसच्या सदस्यांत शाब्दिक चकमकी सुरू असतानाच केंद्राने राज्य सरकारकडून शिफारस आल्यास त्वरित सीबीआय चौकशी करण्याचा आदेश देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यभरात रवीकुमार यांच्या संशयास्पद मृत्यूच्या सीबीआय चौकशीसाठी निदर्शने सुरू आहेत. तामिळनाडू व प.बंगालसारख्या राज्यांमधील कायदा व सुव्यवस्थेवर विविध पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपचे प्रल्हाद जोशी यांनी शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना कर्नाटकमधील कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. रवीकुमार यांच्या मातापित्याने केलेली सीबीआय चौकशीची मागणी राज्य सरकारने स्वीकारलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्य सरकार सीबीआय चौकशीची शिफारस करणार असेल तर तडकाफडकी आदेश देण्याची केंद्राची तयारी आहे, असे गृहमंत्री राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)