सीबीआयकडून डॉ.मनमोहन सिंग यांची चौकशी
By Admin | Updated: January 21, 2015 02:21 IST2015-01-21T02:21:50+5:302015-01-21T02:21:50+5:30
उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरीत करण्यात आलेल्या कोळसा खाणपट्ट्यांबाबत सीबीआयने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे.

सीबीआयकडून डॉ.मनमोहन सिंग यांची चौकशी
कोळसा खाणपट्टे प्रकरण
नवी दिल्ली : उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरीत करण्यात आलेल्या कोळसा खाणपट्ट्यांबाबत सीबीआयने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. स्वत: त्यांनी किंवा सीबीआयने याबाबत मौन पाळले आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांचा एक चमू दोन दिवसांपूर्वी डॉ. सिंग यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी गेला होता. या तपास संस्थेला विशेष न्यायालयात २७ जानेवारी रोजी स्थिती अहवाल दाखल करायचा आहे. हिंदाल्को कंपनीला तालाबिरा-२ खाणपट्ट्याचे वाटप करण्यात आल्याबद्दल १६ डिसेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही चौकशी करण्यात आली. हे वाटप झाले त्या वेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. दरम्यान, सीबीआयचे प्रवक्ते कंचन प्रसाद यांनी चौकशीबाबत भाष्य टाळले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका निकटस्थ सहकाऱ्याला याबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी चौकशी झाल्याचा इन्कार केला.
पत्रांबद्दल विचारपूस
कुमारमंगलम बिर्ला यांनी ७ मे २००५ आणि १७ जून २००५ रोजी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पत्र पाठवून तालाबिरा-२ खाणीचे वाटप करण्याची विनंती केली होती. या पत्रांबद्दल यापूर्वी कोळसा मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा झालेली आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश भरत पराशर यांनी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला नव्हता. त्या काळी कोळसा मंत्रालयाची तात्पुरती जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. सिंग यांची चौकशी करून विविध पैलू विचारात घेण्याचा आदेश न्या. पराशर यांनी दिला होता.