कावेरीचे पाणी पेटले : बंगळुरूमध्ये गोळीबारात एक ठार

By Admin | Updated: September 13, 2016 06:16 IST2016-09-13T06:16:19+5:302016-09-13T06:16:19+5:30

कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात हिंसाचार सुरू झाला असून, अनेक ठिकाणी जाळपोळीच्या व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.

Cauvery floods: One killed in firing in Bangalore | कावेरीचे पाणी पेटले : बंगळुरूमध्ये गोळीबारात एक ठार

कावेरीचे पाणी पेटले : बंगळुरूमध्ये गोळीबारात एक ठार

बंगळुरू/चेन्नई : कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात हिंसाचार सुरू झाला असून, अनेक ठिकाणी जाळपोळीच्या व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही राज्यांत ट्रक्स आणि हॉटेल्सवर हल्ले सुरू असून, बंगळुरूमध्ये आणि कर्नाटकच्या काही भागात हिंसाचाराचे प्रकार घडले. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या राजधानीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये आगारात उभ्या असलेल्या २0 बसना आगी लावल्यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली. बंगळुरूच्या पिनया भागात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर एक जण जखमी झाला असून, परिस्थिती चिघळत चालल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.

चेन्नईतील कन्नड मालकाच्या हॉटेलवर आणि रामेश्वरममध्ये कर्नाटकच्या सात पर्यटक वाहनांवर हल्ले करण्यात आले. इरोड आणि पुडुच्चेरीमध्ये निदर्शकांनी कर्नाटकच्या बँक शाखांत गोंधळ घातला. हॉटेलवरील हल्ल्यासंदर्भात चार तर पुडुच्चेरीत २५ जणांना ताब्यात घेण्यात आले. तामिळनाडूमध्ये कर्नाटकच्या सरकारच्या काही कार्यालयांवर आणि व्यापारी प्रतिष्ठानांवर हल्ले झाले. कन्नड अभिनेत्याविरुद्ध सोशल मीडियात २२ वर्षांच्या तमिळ तरुणाने कथित अवमानकारक भाष्य केल्याबद्दल त्याला बंगळुरूमध्ये मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे हल्ले झाले. ते वृत्त येताच कर्नाटकातील
बंगळुरू, मंड्या, मैसूर, चित्रदुर्ग, धारवाड जिल्ह्यांत तामिळनाडूचे रजिस्ट्रेशन असलेल्या ट्रक्सवर दगडफेक करण्यात आली आणि काही ठिकाणी ते पेटवण्यात आले.

१२ हजार क्युसेक्स पाणी सोडावे लागणार
कर्नाटकने तामिळनाडूला २० सप्टेंबरपर्यंत रोज १५ हजार क्सुसेक्सऐवजी १२ हजार क्सुसेक्स पाणी सोडावे, अशी सुधारणा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात केली. कर्नाटक व तामिळनाडूने कायदा व सुव्यवस्था कायम राहील याची काळजी घेण्यासही न्यायालयाने सांगितले.
सुप्रीम कोर्टाने ५ सप्टेंबर रोजीचा आदेश स्थगित ठेवावा ही कर्नाटकची विनंतीही फेटाळताना आमच्या आदेशाचे पालन करा, असे स्पष्ट केले. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा हा काही न्यायालयाच्या आदेशात बदल करण्याचा आधार होऊ शकत नाही, असे न्या. दीपक मिश्र आणि यु. यु. ललित यांच्या खंडपीठाने म्हटले.


जयललितांना पत्र
तामिळनाडूतील कानडी भाषिक लोकांना हिंसाचाराला तोंड द्यावे लागत असल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना पत्र लिहून कानडी लोकांची सुरक्षितता व संरक्षण करण्याची विनंती केली. कर्नाटकातील तमिळ भाषिकांची योग्य ती काळजी घेतली जाईल, असेही म्हटले आहे.

समितीची बैठक
कावेरी सुपरवायझरी समितीची बैठक केंद्रीय जलस्रोत सचिव शशी शेखर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी येथे झाली. २० सप्टेंबरनंतर पाणी सोडण्याचे प्रमाण ठरविले जाईल, असे या बैठकीत ठरवण्यात आले.

Web Title: Cauvery floods: One killed in firing in Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.