देशात आजही जातीयवाद कायम - राहुल गांधी
By Admin | Updated: June 2, 2015 17:55 IST2015-06-02T17:55:05+5:302015-06-02T17:55:05+5:30
देशातील दलितांचे अधिकार हिरावून घेतले जात असून देशात आजही जातीयवाद कायम असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
देशात आजही जातीयवाद कायम - राहुल गांधी
ऑनलाइन लोकमत
महु, दि. २ - देशातील दलितांचे अधिकार हिरावून घेतले जात असून देशात आजही जातीयवाद कायम असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या कार्यक्रमाला काँग्रेसने मध्यप्रदेशातील महू येथून आजपासून प्रारंभ केला त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेल्या मध्यप्रदेशातील महू गावाची निवड करुन आम्हीच बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार आहोत असे दाखविणा-या काँग्रेस आणि २०१५ ते २०१६ हे वर्ष आंबेडकर यांची १२५ वे जयंती वर्ष देशभर साजरे करणार असल्याची घोषणा करणारे केंद्रातील भाजप सरकारमध्ये पुन्हा एकदा आंबेडकर यांच्या श्रेयवादावरुन जुंपणार असल्याचे दिसत आहे.
देशात जातीयवाद संपवण्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्याची रिंगटोन वाजवली म्हणून दलित तरुणाची हत्या होतेय, केवळ मुस्लीम असल्यानं युवकाला नौकरी नाकारली जातेय, तसेच केंद्र सरकारवर टीका केली म्हणून मद्रास आयआयटीमध्ये आंबेडकर-पेरीयार या दलित संघटनेवर बंदी घातली जातेय हा दलितांचे हक्क हिरावले जात असल्याचाच प्रकार आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशात जातीधर्माच्या आधारावर भेदभाव व्हायला नाही पाहिजे. संविधानात सर्व धर्मांना समानतेचा अधिकार बहाल करण्यात आला असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेसने शिक्षण आणि भोजन अधिकार हा सर्व गरीब व्यक्तींसाठी दिला असल्याचे आठवण करुन दिली. देशातील जातीयवाद संपवण्यासाठी तरुणांनी एकत्र यायला हवे असे आवाहन राहुल गांधी यावेळी केले.