कॅश फॉर व्होट : तेदेपा आमदारासह तिघांच्या घरावर छापे
By Admin | Updated: June 10, 2015 00:09 IST2015-06-10T00:09:59+5:302015-06-10T00:09:59+5:30
भ्रष्टाचारविरोधी शाखेच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी मंगळवारी तेलगू देसम पार्टीचे आमदार रेवंथ रेड्डी आणि अन्य दोघांच्या घरावर छापे घातले.

कॅश फॉर व्होट : तेदेपा आमदारासह तिघांच्या घरावर छापे
हैदराबाद : कॅश फॉर व्होट घोटाळ्यावरून वादळ उठले असतानाच भ्रष्टाचारविरोधी शाखेच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी मंगळवारी या घोटाळ्यात अटक करण्यात आलेले तेलगू देसम पार्टीचे आमदार रेवंथ रेड्डी आणि अन्य दोघांच्या घरावर छापे घातले.
दरम्यान, कॅश फॉर व्होटप्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे फोन बेकायदेशीररीत्या टॅप केल्याबद्दल आंध्र प्रदेश पोलिसांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरुद्ध जवळपास ५० प्रकरणे दाखल केली आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे या दोन राज्यातील सत्तारूढ पक्षांदरम्यानची कटुता आणखी वाढली आहे.
एसीबी अधिकाऱ्यांच्या तीन पथकांनी आमदार रेड्डी, सेबास्टियन हॅरी आणि उदय सिम्हा यांच्या निवासस्थानी एकाचवेळी छापे घालून झडती घेतली. या झडतीत कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज सापडले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तथापि रेड्डी यांच्या घरून एक संगणक जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. ३१ मे रोजी तेलंगण राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत तेदेपाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी नामनियुक्त आमदार एल्विस स्टीफन्सन यांना ५० लाख रुपयांची लाच देताना रेड्डी आणि अन्य दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)