Rahul Gandhi Marathi News: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची २३ जानेवारी रोजी जयंती होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले. त्यांनी केलेल्या पोस्टवर आक्षेप घेत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण कोलकातामधील भवानीपूर पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
राहुल गांधींची पोस्ट, आरोप काय?
२३ जानेवारी २०२५ रोजी राहुल गांधींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करणारी पोस्ट केली. त्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या तारखेबद्दल महासभेने आक्षेप घेतला आहे.
या पोस्टविरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या घराबाहेर महासभेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात निदर्शने केली. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी म्हणाले की, "राहुल गांधी तोच वारसा पुढे चालवत आहे, ज्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आधी काँग्रेस आणि नंतर देश सोडायला भाग पाडले. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाने नेहमीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती पुसण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळीही त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल चुकीची माहिती दिली आहे."
राहुल गांधींच्या पोस्टमध्ये काय?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी जी पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाल्याचा उल्लेख केला आहे. याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान ताइहोकू (आता ताईपे, तैवानची राजधानी) येथे दुर्घटनाग्रस्त झाले होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कोणत्या तारखेला झाला, याबद्दल निश्चित माहिती नाही. ते बेपत्ता झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या आयोगालाही त्यांच्या मृत्यूच्या तारखेबद्दल निश्चित माहिती मिळाली नाही.
या पोस्टवरून राहुल गांधी यांच्यावर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकनेही टीका केली आहे. ही ती संघटना आहे, जिची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर केली होती. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपनेही राहुल गांधींवर या पोस्टवरून टीका केली आहे.