मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील भाजपाच्या एका नेत्याचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाचा हा नेता एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. मनोहरलाल धाकड असे व्हिडीओ व्हायरल झालेल्या भाजपाच्या नेत्याचं नाव असून, हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पक्षाच्या जिल्हा संघटनेत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील बनी गावातील रहिवासी असलेले भाजपाचे नेते मनोहरलाल धाकड यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहो. यामध्ये ते एका महिलेसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवरील असल्याचे सांगण्यात येत आहे. महामार्गाच्या कडेला कार थांबवल्यानंतर धाकड हे महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ महामार्गावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच हा व्हिडीओ १३ मे २०२५ रोजीचा असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कारचा एक क्रमांकही दिसत आहे. तसेच या कारच्या मध्य प्रदेश परिवहन मंडळाकडे असलेल्या नोंदणीनुसार ही कार मनोहरलाल धाकड यांच्या नावावर आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये याच कारच्या आत आणि बाहेर भाजपा नेते महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसले. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पक्ष मनोहरलाल धाकड यांच्यावर कमालीचा नाराज आहे.
तर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रतलाम रेंजचे डीआयजी मनोज सिंह यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ते म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणे निंदनीय आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती पोलिसांकडून घेतला जात आहे. याबाबत काही पुरावे मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.