राजधानीवर वर्चस्वासाठीचे रण दिल्लीत टिपेला
By Admin | Updated: February 5, 2015 02:42 IST2015-02-05T02:42:59+5:302015-02-05T02:42:59+5:30
अरविंद केजरीवाल भाजपचे एजंट आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी कुठेही धरणे आंदोलन केलेले नाही,

राजधानीवर वर्चस्वासाठीचे रण दिल्लीत टिपेला
‘ते’ भाजपचेच एजंट
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल भाजपचे एजंट आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी कुठेही धरणे आंदोलन केलेले नाही, या शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी जहांगीरपुरी येथील रॅलीत हल्लाबोल केला.
काँग्रेसचे सरकार असताना दिल्लीत काहीही घडले तरी केजरीवाल धरणे-आंदोलन सुरू करायचे. बलात्काराची घटना घडली तरी केजरीवाल धरणे द्यायचे, मात्र आता दिल्लीत बलात्काराच्या घटनांत वाढ होऊनही ते चूप आहेत.
नटराजन मुद्यावर भाष्य
अलीकडेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या माजी पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी मोदी आणि भाजप सरकारच्या सांगण्यावरूनच काँग्रेसवर आरोप केले आहेत, असे सांगत राहुल गांधी यांनी प्रथमच या मुद्यावर भाष्य केले. गरीब आणि आदिवासींच्या कल्याणात रस असल्यामुळेच मी पर्यावरण जपतानाच गरीब आणि आदिवासींच्या कल्याणाकडे लक्ष देण्याची सूचना मी नटराजन यांना केली होती.
गरीब आणि आदिवासींसाठी मी लढाई लढलो आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. गरीब ,झोपडपट्टीवासी आणि कमकुवत घटकांसाठी माझी लढाई सुरूच राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मोदींचा १० लाखांचा
सूट, ‘मेड इन युके’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतभेटीवर आले तेव्हा परिधान केलेला १० लाखांचा सूट ‘मेक इन युके’ होता, असा उल्लेख राहुल गांधी यांनी केला. मोदीजी म्हणाले, रोजगार देणार. मेक इन इंडियाचा नाराही दिला. त्याचे मार्केटिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घातले. त्यातून काही निष्पन्न झाले काय, ते सांगा? मोदींनी १० लाख रुपयांचा सूट घातला. तो मेक इन इंडिया नव्हे तर मेक इन युके (ब्रिटन)होता, अशा बातम्या वृत्तपत्रात आल्या आहेत. तेच मोदी मेक इन इंडिया आणि रोजगाराच्या बाता करीत आहेत, असेही राहुल म्हणाले.
इमोशनल
भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी बुधवारी एका रॅलीप्रसंगी भाऊक झाल्या. तुम्ही मला प्रेम द्या, मी त्याची पुरेपूर उतराई होेण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
३२ लाखाची दारु दिल्लीत जप्त
नवी दिल्ली : दिल्लीत पैसा आणि दारूचा खेळ सुरू झाला आहे. मतदारांना पैसे आणि दारूचे आमीष दाखविले जात असल्याचे आढळून आले. निवडणूक आयोगाच्या निगराणी पथकाने आतापर्यंत ३२ लाख रुपयांची रोख, ३४ हजार लिटर दारू व ३५ शस्त्रेही जप्त केली.