नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम सुरूच राहणार
By Admin | Updated: December 4, 2014 00:49 IST2014-12-04T00:49:15+5:302014-12-04T00:49:15+5:30
नक्षलवाद्यांंचा दृढपणे मुकाबला करण्यास सरकार कटिबद्ध आहे़ ही समस्या मुळासकट उपटून काढेपर्यंत नक्षलविरोधी मोहीम सुरूच राहील

नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम सुरूच राहणार
नवी दिल्ली : नक्षलवाद्यांंचा दृढपणे मुकाबला करण्यास सरकार कटिबद्ध आहे़ ही समस्या मुळासकट उपटून काढेपर्यंत नक्षलविरोधी मोहीम सुरूच राहील, अशी ग्वाही सरकारने बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात दिली़
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी सकाळी केलेल्या भीषण हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) १३ कर्मचारी ठार तर तेवढेच गंभीर जखमी झाले होते़ घटनास्थळाचा दौरा करून परतल्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षली हल्ल्याच्या घटनेवर स्वत:हून लोकसभा आणि राज्यसभेत निवेदन केले़
नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे़ सरकारच्या बहुआयामी उपाययोजनांमुळे नक्षलवाद्यांंचे मनसुबे डगमगू लागले आहेत़ आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे प्रमाण यावर्षी वाढले आहे. २०११ पासून नक्षली हिंसाचारातही घट झाली आहे़ ही समस्या समूळ नष्ट करेपर्यंत सुरक्षा दलाची मोहीम सुरू राहील़ यात लढणाऱ्या सुरक्षा जवानांना सरकार सर्व आवश्यक साधन सुविधा पुरवेल, असे राजनाथसिंहांनी यावेळी सांगितले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)