कॅबिनेट सचिव अजित सेठ यांना आणखी मुदतवाढ
By Admin | Updated: December 6, 2014 00:03 IST2014-12-06T00:03:09+5:302014-12-06T00:03:09+5:30
एका असामान्य घडामोडीत मोदी सरकारने कॅबिनेट सचिव अजित सेठ यांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

कॅबिनेट सचिव अजित सेठ यांना आणखी मुदतवाढ
नवी दिल्ली : एका असामान्य घडामोडीत मोदी सरकारने कॅबिनेट सचिव अजित सेठ यांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. सेठ यांना मुदतवाढ मिळण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी संपुआ सरकारने जून २०१३ मध्ये सेठ यांना सरसकट एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. त्यानंतर त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मोदी सरकारने तिसऱ्यांदा त्यांना मुदतवाढ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने या मुदतवाढीला मंजुरी दिली आहे. या संदर्भातील औपचारिक आदेश १३ डिसेंबरला जारी केला जाईल. कॅबिनेट सचिवांना त्यांचा दोन वर्षांचा निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुदतवाढ देण्यात असाधारण असे काहीच नाही, असे साऊथ ब्लॉकने म्हटले आहे. परंतु संपुआची पसंत असलेल्या एका आयएएस अधिकाऱ्यावर मोदी यांनी पुन्हा विश्वास व्यक्त केल्यामुळे नोकरशहांच्या भुवया उंचावल्या आहेत. तथापि कॅबिनेट सचिवपदाच्या शर्यतीत असलेल्या काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना संपविण्याच्या उद्देशानेच सेठ यांना ही मुदतवाढ देण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सेठ यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे वित्त सचिव राजीव महर्षि किंवा ऊर्जा सचिव पी. के. सिन्हा यांना जूनपर्यंत तरी कॅबिनेट सचिवपदाच्या शर्यतीत राहण्याची संधी मिळाली आहे; परंतु गृहसचिव अनिल गोस्वामी, पेट्रोलियम सचिव सौरभ चंद्रा, कंपनी कामकाज सचिव नावेद मासूद आणि अन्य अनेकांच्या कॅबिनेट सचिव बनण्याच्या आशा मावळल्या आहेत.
उत्तर प्रदेशमधील १९७४ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेले सेठ १४ जून २०११ पासून कॅबिनेट सचिवपदावर आहेत. आणि १३ जून २०१३ पासून त्यांना सतत मुदतवाढ देण्यात येत आहे. ते येत्या १३ डिसेंबर रोजी निवृत्त होणार होते. (विशेष प्रतिनिधी)