कॅबिनेट मंत्र्याने दाखवलेल्या तत्परतेमुळे वाचली महिलेची अब्रू
By Admin | Updated: March 21, 2017 16:28 IST2017-03-21T16:27:34+5:302017-03-21T16:28:41+5:30
मंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळावरुन चार आरोपींना अटक करुन त्यांची कारागृहात रवानगी केली आहे

कॅबिनेट मंत्र्याने दाखवलेल्या तत्परतेमुळे वाचली महिलेची अब्रू
>ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. 21 - उत्तराखंडमधील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री प्रकाश पंत यांच्या तत्परतेमुळे एका महिलेची अब्रू वाचली आहे. प्रकाश पंत यांनी दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळावरुन चार आरोपींना अटक करुन त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिथोरागड येथे राहत असणारं एका दांपत्य माहिती अधिकारासंबंधी एका प्रकरणी सोमवारी होणा-या सुनावणीसाठी एक दिवस अगोदरच पोहोचलं होतं. माहिती अधिकार कार्यालयात पोहोचले असता तेथील दोन कर्मचा-यांनी रात्री तिथेच थांबण्याचा सल्ला दिला.
रात्रीचं जेवण झाल्यानंतर तिथे उपस्थित दोन कर्मचा-यांनी आपल्या अन्य दोन मित्रांना बोलावून घेतलं. रात्री 11 वाजता चौघांनी महिलेसोबत छेडछाड आणि अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. विरोध केल्यानंतर दोघांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान महिलेच्या पतीने कशातरी प्रकारे लपून मंत्री प्रकाश पंत यांना फोन करुन परिस्थितीची माहिती देत मदत मागितली. यानंतर प्रकाश पंत यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिक्षक स्विटी अग्रवाल यांना फोन करुन कारवाईचे आदेश दिले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेण्याचा आदेश दिला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दांपत्याची सुटका केली आणि चारही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख पटली असून जगमोहन सिंग चौहान, अनिल रावत, जगदीश सिंह आणि हरि सिंह पेटवला अशी त्यांची नावे आहेत. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील तिघे कर्मचारी असून जगदीश हा चहावाला आहे.