दिल्लीतील मॉरिस नगर भागात चालत्या कॅबमध्ये चालकाने डीयूच्या विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदवून काही तासांतच आरोपी चालक लोम शंकरला अटक केली. तसेच त्याची कॅबही जप्त केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय विद्यार्थिनी मूळची बेंगळुरूची आहे आणि ती काश्मिरी गेट येथील आंबेडकर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ती दोन महिन्यांपूर्वी मॉडेल टाऊन परिसरात भाड्याच्या घरात राहण्यासाठी आली. तिला सोमवारी विद्यापीठात जायला उशीर होत असल्यामुळे तिने अॅपवरून कॅब बुक केली. बुकिंग दरम्यान, वेटिंग टाइम १० मिनिटांचा दाखवत होता. मात्र, कॅब चालक शंकरने तिला फोन केला आणि कॅब बुकिंग रद्द करू नका, अशी विनंती केली.
पीडितेने सांगितले की, कॅबमध्ये बसेपर्यंत शंकरचे वर्तन सामान्य होते. त्याने तिला पुढच्या सीटवर बसण्यास सांगितले, पण विद्यार्थिनीने नकार दिला आणि मागे बसली. विद्यार्थिनीने सांगितले की संभाषणादरम्यान, शंकरला कळले की, ती दक्षिण भारतातील आहे. त्यानंतर त्याने अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. शंकरने तिला वारंवार स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच त्याने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. शंकरच्या लज्जास्पद कृत्यानंतर विद्यार्थिनीने अलार्म वाजवला. परंतु, त्याने कॅब थांबवली नाही. काही अंतर गेल्यानंतर, डीयू नॉर्थ कॅम्पसमध्ये कॅब थांबवण्यात आली.
शंकरने कॅब थांबवताच विद्यार्थिनी तिथून पळून गेली. काही अंतरावर पोहोचल्यानंतर, तिने तिच्या ओळखीच्या लोकांना तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तिने तिच्या मित्रांसह मॉरिस नगर पोलीस ठाणे गाठून संबंधित कॅबचालकाविरोधात लेखी तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ड्रायव्हर शंकरला अटक केली. तपासात असे दिसून आले की, ४८ वर्षीय शंकर हा मलकागंजचा रहिवासी आहे. मॉरिस नगर पोलिसांनी कॅब जप्त केली आणि फॉरेन्सिक आणि क्राइम टीमकडून त्याची चौकशी करून पुरावे गोळा केले जात आहेत.