CAA Protest: पोलीस हवालदाराच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये गोळी घुसली; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 08:43 AM2019-12-22T08:43:35+5:302019-12-22T08:43:40+5:30

जमावाकडून झाडण्यात आलेली गोळी पोलीस कर्मचाऱ्याच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये घुसली

CAA protest Narrow escape for Firozabad Police Constable after a bullet got stuck in his wallet | CAA Protest: पोलीस हवालदाराच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये गोळी घुसली; अन्...

CAA Protest: पोलीस हवालदाराच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये गोळी घुसली; अन्...

Next

आग्रा: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागलं असून पोलिसांवर हल्लेदेखील झाले आहेत. उत्तर प्रदेशात असे सर्वाधिक प्रकार घडले आहेत. शनिवारी उत्तर प्रदेशात आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांवर गोळीबार झाला. त्यावेळी एका पोलिसाचा जीव थोडक्यात वाचला. जॅकेटमध्ये असलेल्या पाकिटामुळे पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचले. 

फिरोजाबादमध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार विजेंद्र कुमार आणि त्यांचे सहकारी धर्मेंदर यांच्यावर शनिवारी गोळीबार झाला. धर्मेंदर यांच्या पायाला गोळी लागली. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या विजेंद्र कुमार यांच्या दिशेनंदेखील गोळीबार झाला. बंदुकीतून झाडण्यात आलेली गोळी त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये घुसली. मात्र विजेंद्र कुमार अतिशय सुदैवी ठरले. जमावाकडून झाडली गेलेली गोळी जॅकेटच्या वरील बाजूस असलेल्या खिशाला लागली. या खिशात विजेंद्र यांनी पाकिट ठेवलं होतं. जमावाकडून झाडलेली गोळी याच पाकिटात घुसली आणि विजेंद्र यांचा जीव वाचला.




उत्तर प्रदेश पोलीस दलात सध्या याच घटनेची चर्चा आहे. हा माझा पुनर्जन्म असून त्याबद्दल मी देवाचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया विजेंद्र कुमार यांनी व्यक्त केली. 'मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि गोळीबार होत असताना आम्ही जमावाचा पाठलाग करत होतो. त्यावेळी एक गोळी माझ्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये घुसली. ती गोळी छातीवरच लागणार होती. मात्र नेमकं त्याच जागी माझं पाकिट होतं. ती गोळी त्या पाकिटात घुसली. त्या पाकिटात मी भगवान शंकराचा फोटो ठेवला होता,' अशा शब्दांत विजेंद्र यांनी त्यांच्या सोबत घडलेला प्रसंग सांगितला. 

आंदोलनांदरम्यान पोलीस मोठ्या प्रमाणावर लक्ष्य होत असल्याचं फिरोजाबाद पोलीस ठाण्याचे अधीक्षक सचिंद्र पटेल यांनी सांगितलं. 'हिंसक जमावानं पोलिसांवर गोळीबार केला. विजेंद्र यांचं नशीब बलवत्तर असल्यानं त्यांचा जीव वाचला. जमावानं केलेल्या दगडफेकीत ४० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत', अशी माहिती पटेल यांनी दिली. 

Web Title: CAA protest Narrow escape for Firozabad Police Constable after a bullet got stuck in his wallet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.