उत्तर प्रदेशातील बरेली येथून अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. बरेलीत एका आनंदाच्या सोहळ्यात क्षणात शोककळा पसरली आहे. लग्नाच्या २५ व्या वाढदिवशीच बरेली येथील चपलांच्या व्यावसायिकाचे आकस्मिक निधन झालं. कार्यक्रम सुरु असतानाच हा सगळा प्रकार घडल्याने उपस्थित असलेल्या सर्वांनाच अश्रू अनावर झाले. डान्स करत असतानाच व्यावसायिकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
२ एप्रिलला व्यावसायिक वसीम आणि आणि त्यांची पत्नी फराह यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस होता. त्या दिवशी फराह यांना किंचितही कल्पना नव्हती की त्यांच्या २५ व्या लग्नाचा वाढदिवस हा वसीम यांचा शेवटचा दिवस असणार आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दोघांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. फराह आणि वसीम यांनी मिळून केक कापला. त्यानंतर पती-पत्नी दोघांनी खूप डान्स केला. मात्र डान्स करत असतानाच अचानक वसीम यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते फराह यांच्यासमोरच स्टेजवर कोसळले. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वसीम यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे.
फराह एका शाळेत शिक्षिका आहेत तर वसीम हे व्यावसायिक होते. बुधवारी वसीम आणि फराह यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस होता. हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी दोघेही खूप दिवसांपासून वाट पाहत होते. यासाठी त्यांनीबारादरी येथील सॅटेलाइट जवळील फहम मॅरेज लॉनमध्ये लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला होता. रात्री बाराच्या सुमारास मित्रांसह नातेवाईकांनाही बोलावून केक कापण्यात आला. त्यानंतर उत्साहित असलेले वसीम आणि फराह स्टेजवर डान्स करायला गेले. नाचत असताना वसीम यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर एकच आरडाओरडा सुरु झाला.
कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ शेजारील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी वसीम यांना मृत घोषित केले. वसीम यांच्या मृत्यूची बातमी समजताच हॉलमध्ये अचानकपणे शोककळा पसरली. हॉलमध्ये काही क्षणांपूर्वी टाळ्या आणि हशा होता तिथे किंकाळ्या आणि अश्रूंचा महापूर आला होता. या भीषण घटनेने संपूर्ण कुटुंब आणि उपस्थित पाहुणे हादरले आहेत.