व्यावसायिक अमीन सोमजी यांना अटक व जामीन
By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:10+5:302015-08-28T23:37:10+5:30

व्यावसायिक अमीन सोमजी यांना अटक व जामीन
>पुणे : जमिनीच्या व्यवहारात लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी व्यावसायिक अमीन अमीरअली सोमजी (वय 41, रा. जगन्नाथ सोसायटी, बोट क्लब रस्ता) यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने काही अटी व शर्तींच्या आधारे जामीन मंजूर केला आहे. हा प्रकार 22 फेब्रुवारी ते 13 जुलै 2014 दरम्यान घडला होता.याप्रकरणी मुराद मददअली पटेल (वय 55, रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली), अमीरअली सोमजी महंमद सोमजी (वय 55, बोट क्लब), महेश मारूती जाधव (रा. कराड रोड, हराळेमळा विटा, सांगली), सुनिल एकनाथ आमले (रा. शितोळे गलली, खानापूर सांगली) तसेच विटा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रविंद्र एम. साळोखे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुराद आणि जाधव यांनी अटकपुर्व जामीन घेतलेला आहे. तर आमीरअली आणि आमले यांचा अटकपुर्व जामीन उच्च न्यायालयाने नामंजूर केला. याप्रकरणी महेबुब अब्दुल गफार शेख (40, माळवाडी हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांच्या आजे सासू जहिराबी इस्माईल शिकलगार यांच्या मालकीची सांगली विटा येथील 1 हेक्टर 55 आर जमीन महेबुब शेख यांना 65 लाखाला विकण्यात आली होती. सावकारीचा व्यवसाय असलेल्या पटेल आणि अमीर अली यांच्याकडून शेख यांनी व्यवसायाकरिता 65 लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जापोटी तारण म्हणून विट्यातील ही जमीन ठेवण्यात आली होती. या दोघांनी त्यावेळी मुळ खरेदीखतासह, सही व अंगठे केलेले कोरे कागद, दस्त व कोरे धनादेश घेतले होते. या कादपत्रांचा दुरुपयोग करीत खोटे बनावट दस्त तयार केले. त्याचा वापर करुन शेख यांच्याविरूध्द दाखल केलेल्या खटल्याचा निकाल आरोपींच्या विरोधात लागला. त्यानंतर ही मिळकत पटेल आणि सोमजी यांना विकावी म्हणून दबाब टाकायला सुरुवात केली. वारंवार मिळत असलेल्या धमक्यांच्या विरोधात शेख यांनी लष्कर न्यायालयात खाजगी खटला दाखल केला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या अमीन सोमजी यांचा अटपुर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना अटक करुन लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी अमीनच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. परंतु बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे.