सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून शस्त्राचा धाक दाखवित घरफोडी
By Admin | Updated: January 6, 2015 00:06 IST2015-01-05T23:10:29+5:302015-01-06T00:06:13+5:30
कॅनडा कॉर्नरजवळील सोमवारी पहाटेची घटना : सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल

सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून शस्त्राचा धाक दाखवित घरफोडी
कॅनडा कॉर्नरजवळील सोमवारी पहाटेची घटना : सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल
नाशिक : हॉटेलच्या सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवून त्याचे हात-पाय नायलॉनच्या दोरीने बांधून तिजोरीतील रोकड, सीसीटीव्हीचे फुटेज व नोटा मोजण्याचे मशीन दोघा चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास कॅनडा कॉर्नर परिसरात घडली़ शहराच्या मध्यवस्तीत घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे इतर व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, शरणपूररोडवरील बीएसएनएल कार्यालयासमोर द फं्रट पेज हॉटेलमध्ये विशाल भास्कर निकम हे कॅशियर म्हणून काम करतात़ रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हॉटेल बंद केले व त्यांच्या रूममध्ये झोपण्यास गेले़ सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास शेजारील रूममध्ये ठोकल्याचा आवाज आल्याने निकम यांनी कामगारांसह जाऊन दरवाजा उघडला असता हॉटेलचे सुरक्षारक्षक वसंत रामभाऊ खरात यांच्या तोंडात बोळा कोंबलेला व हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत पडलेले दिसले़
खरात यांची सुटका करून निकम यांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पहाटे दोन वाजेच्या सुमारास दोन हिंदी भाषिक इसमांनी चाकूचा धाक दाखवून हातपाय बांधून ठेवले़त्यातील एकाने ज्यूस सेंटरचे शटर उचकटून तिजोरी तोडली. त्यातील ७० हजार रुपयांची रोकड, सीसीटीव्हीचे डिव्हीआर मशीन व पैसे मोजण्याचे मशीन असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला़ या प्रकरणी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)