बुलेट ट्रेनच्या तिकिटांची किंमत एसी फर्स्ट क्लासपेक्षा दीडपट असणार
By Admin | Updated: May 4, 2016 19:27 IST2016-05-04T19:27:56+5:302016-05-04T19:27:56+5:30
बहुप्रतीक्षित बुलेट ट्रेनच्या तिकिटांची किंमत साधारण एसी क्लासपेक्षा दीड पट जास्त असणार आहे.
बुलेट ट्रेनच्या तिकिटांची किंमत एसी फर्स्ट क्लासपेक्षा दीडपट असणार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4- बहुप्रतीक्षित बुलेट ट्रेनच्या तिकिटांची किंमत साधारण एसी क्लासपेक्षा दीड पट जास्त असणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद यांमध्ये प्रस्तावित असलेल्या बुलेट ट्रेनचे प्रवासी भाडे हे सध्याच्या रेल्वेमधील फर्स्ट क्लास एसी भाड्याच्या दीडपट असावे, असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून ठेवण्यात आला आहे.
मुंबई आणि अहमदाबाद या शहरांमधून धावणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या फर्स्ट क्लासचे प्रवासी भाडे हे 2,200 रुपये आहे. त्याच वेळी 508 किमी अंतरासाठी बुलेट ट्रेनमधून प्रवास करताना 3,300 रुपये भाडे मोजावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जपानमध्ये सध्या या प्रवासाकरिता भारतीय चलनानुसार साडेआठ हजार रुपये इतका खर्च येतो. जपानची राजधानी असलेल्या टोकियो आणि ओसाका या शहरांना जोडणाऱ्या शिंकनसेन या बुलेट ट्रेनचे प्रवासी भाडे भारतीय चलनानुसार सुमारे साडेआठ हजार रुपये इतके आहे. टोकियो व ओसाका या शहरांमध्ये साडेपाचशे किमी इतके अंतर आहे. पहिल्या टप्प्यातील या बुलेट ट्रेनचा वेग तासाला सुमारे 320 किमी इतका असणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार 2023 पर्यंत मुंबई-अहमदाबाद या लाईनवर धावणारी बुलेट ट्रेनचा प्रतिदिनी सुमारे 36 हजार प्रवास प्रवास करू शकणार आहेत. याचबरोबर, 2053 पर्यंत हा आकडा तब्बल 1,86,000 वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या मार्गावर कोणत्याही इतर स्टेशनवर न थांबता धावणाऱ्या ट्रेनचा एकूण प्रवासी वेळ 2.7 तासांचा असेल, तर प्रत्येक स्टेशनवर थांबणाऱ्या बुलेट ट्रेनचा प्रवासी वेळ 2.58 तास असणार आहे. या मार्गांवर मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी 12 रेल्वे स्टेशने प्रस्तावित आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 97,636 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यासाठी जपान 0.1% च्या सवलतीच्या व्याजाने 1 लाख कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे.