हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी मांडलेल्या २०२६-२७च्या अर्थसंकल्पात अनेक मोठे प्रकल्प आणि योजना जाहीर केल्या आहेत. तामिळनाडूतील मेजेंटा रंगाची कांजीवरम साडी परिधान केलेल्या सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना या राज्यांकरिता दुर्मीळ खनिजांसाठी स्वतंत्र कॉरिडॉरपासून ते हाय-स्पीड रेल कॉरिडॉर आणि टर्टल ट्रेल्सपर्यंत अनेक प्रकल्पांची घोषणा केली.
एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्ता मिळवायची आहे. ती गोष्ट लक्षात घेता निर्मला सीतारामन यांनी त्या राज्यातील दुर्गापूर येथे उत्तम कनेक्टिव्हिटी असलेला 'ईस्ट कोस्ट इंडस्ट्रियल कॉरिडॉर' आणि पाच 'पूर्वोदय' राज्यांमध्ये-बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेश येथे पाच पर्यटनस्थळांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच, गुजरातमधील सुरत आणि बंगालमधील दानकुनी यांना जोडणारा स्वतंत्र मालवाहतूक (फ्रेट) कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला. हा नवीन क्रेट कॉरिडॉर पूर्व ते पश्चिम अशी थेट जोडणी निर्माणकरून लॉजिस्टिक्स व मालवाहतुकीसाठी नवे मार्ग खुले करेल.
कांजीवरम साडी अन् चर्चा
संसदेत सीतारामन यांच्या आजवरच्या अर्थसंकल्पाच्या भाषणाऐवढी त्यांच्या कांजीवरम् साडीचीही चर्चा झाली. हलका रंग, पारंपरिक डिझाइनमुळे ही साडी भारतीय हातमाग कलेचे सुंदर मिश्रणचे प्रतीक वाटत होती. त्यात तामिळनाडूत विधानसभा निवडणुका होत असल्याने चर्चेला अधिक रंग आला.
कॉरिडॉरमार्फतही राज्यांवर कृपादृष्टी
अर्थमंत्र्यांनी सात हाय-स्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा केली. या रेल कॉरिडॉरपैकी तीन निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांना देण्यात आले आहेत-हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरू आणि वाराणसी-सिलीगुडी. उर्वरित चारपैकी दोन महाराष्ट्रासाठी-मुंबई-पुणे व पुणे-हैदराबाद-तर उर्वरित हैदराबाद-बेंगळुरू आणि दिल्ली-वाराणसी दरम्यान असतील.
दुर्मीळ खनिजे कॉरिडॉरचा होणार फायदा
तामिळनाडू, केरळ, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये स्वतंत्र दुर्मीळ खनिजे (रेअर अर्थ) कॉरिडॉर स्थापन करण्याचा प्रस्ताव ही या अर्थसंकल्पातील महत्त्वाची घोषणा. ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश व तामिळनाडू ही खनिजसंपन्न राज्ये आहेत. यापैकी तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांत निवडणुकांत भाजपला मोठे यश मिळवता आलेले नाही.
नारळ उत्पादकांना मिळणार प्रोत्साहन
देशातील सर्वाधिक नारळ उत्पादन होणाऱ्या तामिळनाडू, केरळ या राज्यांना नारळ उत्पादन प्रोत्साहन योजनेचा लाभ होणार आहे. १ कोटी शेतकऱ्यांसह सुमारे ३ कोटी लोकांची नारळ उत्पादनावर उपजीविका अवलंबून आहे. भाजपशासित आसामचा समावेश बौद्ध सर्किट्समध्ये करण्यात येणार असून, पाच 'पूर्वोदय' राज्यांसह या भागांना ४,००० ई-बसद्वारे जोडले जाईल.
कविता, सांस्कृतिक संदर्भांना फाटा
सीतारामन यांनी यंदाच्या भाषणात कविता, सांस्कृतिक संदर्भ किंवा तत्त्वज्ञान टाळून थेट गुंतवणूक, विकास आणि सुधारणांवर लक्ष केंद्रीत केले. ही या अर्थसंकल्पाची विशेष गंमत ठरली. भाषण गुरू रविदास आणि माघ पौर्णिमेच्या उल्लेखाने सुरू झाले. नंतर संपूर्ण भाषण व्यावसायिक, मुद्देसूद होते.
राष्ट्रपतींची भेट आणि दही-साखर
सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी परंपरा म्हणून अर्थमंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपतींनी सीतारामन यांच्या हातावर दही-साखर ठेवून त्यांना व त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या. त्या आधी सीतारामन यांनी कर्तव्य भवनासमोर आपल्या टीमसोबत छायाचित्रे काढली.
Web Summary : Ahead of elections, the budget unveils projects for poll-bound states. Focus on infrastructure, including industrial and rail corridors for West Bengal and Tamil Nadu, along with tourism development and support for coconut farmers. Emphasis on investment and development.
Web Summary : चुनाव से पहले, बजट में चुनावी राज्यों के लिए परियोजनाओं का अनावरण किया गया। पश्चिम बंगाल और तमिलनाडु के लिए औद्योगिक और रेल गलियारों सहित बुनियादी ढांचे पर ध्यान केंद्रित, पर्यटन विकास और नारियल किसानों के लिए समर्थन। निवेश और विकास पर जोर।