लखनौ : समाजवादी पक्षाशी आमच्या पक्षाच्या नव्याने झालेल्या मैत्रीमध्ये फूट पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी सोमवारी केला. त्या म्हणाल्या, आमची मैत्री ही स्वार्थ साधण्यासाठी नसून राष्ट्रीय हितासाठीच आहे.मायावती म्हणाल्या, केंद्रात भाजपाला सत्तेवर येण्यास रोखण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र येऊन काम करावे लागेल. केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांनी त्रासलेल्या गरीब व युवकांसह सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपेतर पक्षांनी एकत्र आले पाहिजे. बसपा-सपाच्या मैत्रीचे संपूर्ण देशभर स्वागत झाल्याचेही त्या म्हणाल्या.देशाचे तसेच लोकांचे हित समोर ठेवून बसपा व सपाचे कार्यकर्ते भाजपाच्या कारस्थानांना बळी पडणार नाहीत व भाजपला पुढील वर्षी सत्तेवर येऊ न देण्यासाठी सगळ््या विरोधी पक्षांसोबत काम करतील. बसपा-सपाची मैत्री आकार घेत असल्याचे पाहून भाजपाचे नेते या मैत्रीविरोधात निराधार वक्तव्ये करीत आहेत. बसपा व सपा हे एकमेकांचे कट्टर शत्रू असतानाही त्यांच्यात मैत्री झाल्यापासून भाजपकडून या मैत्रीवर जोरदार टीका होत आहे. या मैत्रीमुळे गोरखपूर आणि फुलपूर येथील लोकसभेच्या जागा भाजपाला गमवाव्या लागल्या होत्या.नरेंद्र मोदी यांनी रविवारच्या त्यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा केलेला उल्लेख ही शुद्ध धुळफेक असल्याचे मायावती म्हणाल्या. गेल्या चार वर्षांपासून त्यांचे सरकार दलित आणि मागासवर्गीयांशी संबंधित प्रश्नांवर सतत नाटके करीत असून यापुढे मात्र त्यांना त्यापासून राजकीय लाभ मिळणार नाही, असे त्या म्हणाल्या.भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखालील सरकार असताना डॉ. आंबेडकर यांच्या समतेची तत्त्वे वास्तवात कधीही येऊ शकणार नाहीत. कारण त्यांची मानसिकताच संकुचित, धर्मांध व जातियवादी आहे. या मानसिकतेमुळे लोकांनी दीर्घकाळ त्यांना सत्तेपासून दूर ठेवले आणि आता भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार असताना, दलित आणि मागासवर्गीय मागे पडले आहेत, असे त्या म्हणाल्या.
बसपा-सप मैत्री राष्ट्रीय हितासाठीच - मायावती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 03:25 IST