जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते. यानंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी पकडलं. आज पाकिस्तानने पूर्णम कुमार यांची सुटका केली आणि भारताच्या ताब्यात दिलं. देशात परतल्यानंतर पूर्णम कुमार यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पूर्णम कुमार शॉ पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वत्र मिठाई वाटली जात आहे. माध्यमांशी संवाद साधताना कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं की, "आज आम्हाला खूप आनंद झाला आहे. त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि बीएसएफ अधिकाऱ्यांचे आभार मानतो. गेले २ आठवडे आमची रात्रीची झोप उडाली होती. आम्हाला त्यांच्या तब्येतीबद्दल सतत काळजी वाटत होती. आता आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहोत. अखेर आमची प्रार्थना फळाला आली आहेत."
डिफेंस एक्सपर्ट कॅप्टन अनिल गौर (रिटायर्ड) यांनी दिलेल्या माहितीनुसार "आपला जवान अनवधानाने पाकिस्तानला गेला होता. भारताने त्याच्या सुटकेसाठी आवाहन केलं होतं, परंतु पाकिस्तान टाळाटाळ करत होता. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की, त्यांनी अशा कारवाया थांबवाव्यात, अन्यथा त्याचंचं मोठं नुकसान होईल. म्हणूनच पाकिस्तानने जवानाला सोडण्याचा निर्णय घेतला, कारण यामुळे भारत-पाकिस्तान संबंध बिघडू शकले असते."
टीएमसीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत पोस्टमध्ये करण्यात आला आहे. "अनेक दिवसांच्या चिंता आणि अनिश्चिततेनंतर, बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना अखेर भारतात परत आणण्यात आलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः त्यांच्या पत्नीशी अनेक वेळा संपर्क साधला आणि या कठीण काळात त्यांना आश्वासन आणि पाठिंबा दिला" असं म्हटलं आहे.