भावावर ‘बायपास’ झाल्याने उपस्थित राहू शकलो नाही
By Admin | Updated: August 9, 2014 13:07 IST2014-08-09T02:59:18+5:302014-08-09T13:07:55+5:30
राज्यसभेतील अनुपस्थितीबाबत बरीच चर्चा झाली. कोणत्याही संस्थेचा अनादर करण्याची माझी इच्छा नाही.

भावावर ‘बायपास’ झाल्याने उपस्थित राहू शकलो नाही
नवी दिल्ली : राज्यसभेतील अनुपस्थितीबाबत बरीच चर्चा झाली. कोणत्याही संस्थेचा अनादर करण्याची माझी इच्छा नाही. माझा मोठा भाऊ अजितवर ‘बायपास’ सजर्री करावी लागल्याने मला त्याच्या सोबत राहणो भाग होते, असा खुलासा सचिनने दिल्लीत केला.
सचिन व रेखाच्या संसदेतील अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह
राज्यसभेत मुद्दा उपस्थित : दोन वर्षांत रेखा सात, तर सचिन फक्त तीन दिवस हजर
मास्टर ब्लास्टर सचिन व सिनेतारका रेखा या २0१२ साली नामनिर्देशित केलेल्या सदस्यांनी संसदेत आतापर्यंत अनुक्रमे फक्त तीन व सात दिवस आपली हजेरी लावली असून बाकीचे सर्व दिवस संसदेकडे पूर्णपणे पाठ फिरविली आहे. त्यांच्या या अनुपस्थितीवर संसद सदस्यांनी प्रश्नचिन्ह लावले असून अशा व्यक्तींना संसदेवर नियुक्त केले जाऊ नये, असे मत व्यक्त केले आहे. माकपाचे के.पी. राजीव यांनी शुक्रवारी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. या दोन प्रसिद्ध व्यक्तींनी अनुपस्थित राहताना तशी सूचना संसदेला दिली होती काय, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
यावर उत्तर देताना उपसभापती पी.जे. कुरियन यांनी, हा मुद्दा अन्य सदस्यांनीही उपस्थित केल्याचे सांगून त्याबाबतची सर्व माहिती गोळा केल्याचे म्हटले. सचिन तेंडुलकरला २0१२ च्या एप्रिल महिन्यात नामनियुक्त करण्यात आले होते, तेव्हापासून त्याने आतापर्यंत फक्त तीन वेळेस हजेरी लावली आहे. गेल्या १३ डिसेंबर २0१३ ला सचिनची सभागृहातील हजेरी ही अखेरची हजेरी होती. याच धर्तीवर सिनेअभिनेत्री रेखालाही २0१२ च्या एप्रिल महिन्यात राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले होते. रेखाने आतापर्यंत ७ वेळेस सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला होता. रेखाने यावर्षी १९ फेब्रुवारी रोजी हजेरी लावली होती.
तेंडुलकर व रेखा यांनी संसदेत अतिशय कमी वेळा आपली हजेरी लावली व जेव्हा ते हजर होते तेव्हाही अगदी अल्पवेळेसाठी ते येथे थांबले होते, याकडेही सभागृहातील अनेक सदस्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी.पी. त्रिपाठी यांनी संसदेबाहेर हा मुद्दा उपस्थित केला होता.
त्यांनी, अशा प्रकारे वारंवार अनुपस्थित राहणे हा संसद व भारतीय घटनेचा अवमान असल्याचे म्हटले. अशा लोकांना नियुक्तच केले जाऊ नये असे म्हणून, जे संसद सदस्य तेंडुलकर व रेखासोबत छायाचित्रे काढतात त्यांची दया येते, असेही मत व्यक्त केले.
- संविधानाच्या परिच्छेद १0४ नुसार जर एखादा सदस्य विनासूचना ६0 बैठकांमध्ये अनुपस्थित राहिला, तर त्याची जागा रिक्त मानली जाते.
- तेंडुलकर आतापर्यंत ४0 बैठकांमध्ये अनुपस्थित होते, तर रेखाच्या बाबतीत हा आकडा कमी आहे, त्यामुळे त्यांच्यावर उपरोक्त नियम लागू होत नाही, असे कुरियन यांनी स्पष्ट केले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)