अयोध्येतून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. सहादतगंजच्या मरावन टोला गावात शुक्रवारीच धुमधडाक्यात लग्न लागले होते. पहिल्याच रात्री नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला आहे. सकाळी खोलीचे दार उघडत नाहीय, म्हणून त्यांना उठवायला गेलेल्या कुटुंबातील सदस्यांना दोघेही मृतावस्थेत दिसले.
धक्कादायक बाब म्हणजे २४ वर्षीय नवरदेव पंख्याला लटकलेला दिसला तर नवरी मुलगी ही बेडवर निपचित पडलेली होती. कुटुंबीयांनाही काही समजण्यास मार्ग नाहीय. पोलिसांना बोलवण्यात आले आहे, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
प्रदीप आणि शिवानी यांचे ७ मार्चला लग्न झाले होते. सोहावलहून वरात घेऊन ते शनिवारी घरी आले होते. सहजीवनाला सुरुवात करायची ही त्यांची पहिलीच रात्र होती. घरातील सारे झोपी गेले होते. यांच्या खोलीची लाईट चालू होती. रविवारी रिसेप्शन ठेवण्यात आले होते. परंतू, दुपार होत आली तरी खोलीतून ना नवरी बाहेर येत होती, ना नवरदेव. यामुळे त्यांना उठविण्यासाठी दरवाजा ठोठावण्यात आला. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून खिडकी तोडून आतमध्ये गेले असता आतील दृश्य पाहून थरकाप उडाला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, शेजारी देखील जमू लागले आहेत. अशी काय वेळ आली की मुलाचे शव पंख्याला लटकलेले आणि नवरीमुलीचे बेडवर पडलेले होते, असा सवाल सर्वांना सतावत आहे. तसेच नवरीमुलीची हत्या करून नवरदेवाने आत्महत्या केली असावी असाही कयास पोलीस बांधत आहेत.
अयोध्येचे खासदार समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे. शोक व्यक्त करत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. पोलीस या घटनेमागचे कारण शोधत आहेत.