Puri Stampede: ओडिशाच्या पुरी येथे सुरु असलेल्या जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी झाल्याने गालबोट लागलं. प्रचंड जनसमुदारामुळे रथयात्रेतील व्यवस्था फोल ठरल्यामुळे तीन भाविकांचा मृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर काँग्रेसकडून आंदोलन करुन निषेध नोंदवण्यात येत आहे. अशातच भुवनेश्वरमध्ये काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त नरसिंह भोल पोलीस कर्मचाऱ्यांना आंदोलन करणाऱ्यांना अटक करु नका तर त्यांचे पाय तोडा असं सांगत आहेत. जो कोणी त्यांचे पाय तोडेल त्याला बक्षीस मिळेल, असंही भोल म्हणताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन आता संतापाची लाट उसळली असून काँग्रेसकडून नरसिंह भोल यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
पुरी येथे रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या विरोधात भुवनेश्वरमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस आयुक्त त्यांच्या सहकाऱ्यांना आंदोलकांना पाय तोडण्याची सूचना करताना दिसत आहेत. आंदोलन करणाऱ्यांना पकडू नका, फक्त त्यांचे पाय तोडून टाका. जो कोणी पाय तोडेल तो येऊन माझ्याकडून बक्षीस घेईल, असं नरसिंह भोल म्हणताना दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेसने पोलीस आयुक्तांना इशारा देत सरकार बदलायला वेळ लागत नाही, तुमचे पाय सुरक्षित ठेवा असं म्हटलं.
काँग्रेसकडून या घटनेच्या निषेधार्थ शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्यात येणार होते. त्याची तयारी पूर्ण झाली होती. पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. बॅरिकेड्स लावून आंदोलकांना रोखण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलक धरणे आंदोलन करणार असतानाच पोलीस अधिक्षकांनी दिलेली सूचना कॅमेऱ्यात कैद झाली.
दरम्यान, पोलीस आयुक्त नरसिंग भोल कदाचित स्वतःला सिंघम समजू लागले आहेत. व्हिडिओमध्ये, नरसिंग भोल त्यांच्या सहकाऱ्यांना स्पष्टपणे सांगत आहेत की, "त्यांना थांबवू नका, फक्त पाय तोडून टाका! आम्ही थांबण्यासाठी तिथे बसलो आहोत. जो कोणी पाय तोडेल त्याला माझ्याकडून बक्षीस मिळेल."
दुसरीकडे, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर शांततापूर्ण आंदोलने केले आणि आपला संताप व्यक्त केला. सुदैवाने, काँग्रेसचा शांततापूर्ण निषेध हिंसक झाला नाही आणि अतिरिक्त आयुक्तांचा पाय तोडण्याची सूचना राबवावी लागली नाही.