भाजपा आणि मोदी सरकार दोघेही ‘दुतोंडी’
By Admin | Updated: December 2, 2014 08:58 IST2014-12-02T04:46:54+5:302014-12-02T08:58:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे दुतोंडी पक्षाचे सरकार आहे. भाजपा विरोधी पक्षात असताना एक बोलते आणि सत्तेत आल्यावर त्याच्या अगदी उलट बोलते.
भाजपा आणि मोदी सरकार दोघेही ‘दुतोंडी’
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे दुतोंडी पक्षाचे सरकार आहे. भाजपा विरोधी पक्षात असताना एक बोलते आणि सत्तेत आल्यावर त्याच्या अगदी उलट बोलते. भाजपाच्या उक्ती आणि कृतीत मोठा विरोधाभास आहे. खऱ्या अर्थाने हे ‘यू टर्न’ सरकार आहे, असा घणाघाती आरोप करीत काँग्रेसने सोमवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी ‘सहा महिने पार, यू टर्न सरकार’ मथळ्याखाली एक पुस्तिका प्रकाशित करून भाजपा आणि मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मोदी आणि त्यांच्या सरकारने सत्तेत आल्यापासून ज्या मुद्द्यांवर घूमजाव केलेले आहे, असे एकूण २२ मुद्दे या पुस्तिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. मागच्या तीन दिवसांतच असे तीन मुद्दे पुढे आले आहेत, की ज्यावर मोदी आणि त्यांच्या पक्षाने आपली जुनी भूमिका बदलून घूमजाव केले आहे आणि काँग्रेसप्रणीत संपुआ सरकार जे काही सांगत होते, तेच आता मोदी सरकार सांगत आहे.
कॅग, रेल्वे भाडेवाढ, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांपासून संसदेला मुक्त करणे आदी मुद्द्यांवर मोदींनी देशाला मोठमोठे उपदेश दिले आहेत, पण आज परिस्थिती कशी आहे? शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नाही. मोदी सरकारमध्ये गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असलेले आणि गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल असलेले २१ मंत्री आहेत. हे यू टर्न नाही तर काय आहे, असा सवाल माकन यांनी केला. मोदी, त्यांचे मंत्री आणि भाजपा केवळ खोटे बोलून सत्तेत आल्याचा आरोप माकन यांनी या वेळी केला. दिल्लीत निवडणुका जवळ असल्यानेच मोदी सरकारने १९८४च्या दंगलग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे, असा आरोप त्यांनी केला.
>विविध मुद्द्यांवर भाजपा व मोदी यांनी व्यक्त केलेले मत
आणि कालांतराने त्याच मुद्द्यांवर त्यांनी कसे घूमजाव केले,
हे सांगणारे प्रसंग काँग्रेसने पुस्तिकेत दिले आहेत.