नापाक गोळीबाराला BSF चे चोख प्रत्युत्तर, ७ पाकिस्तानी सैनिक ठार
By Admin | Updated: October 22, 2016 07:21 IST2016-10-22T04:34:15+5:302016-10-22T07:21:16+5:30
शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी चांगलीच अद्दल घडवली. त्यांच्या गोळीबाराला भारतीय

नापाक गोळीबाराला BSF चे चोख प्रत्युत्तर, ७ पाकिस्तानी सैनिक ठार
जम्मू : शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी चांगलीच अद्दल घडवली. त्यांच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने सात पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले आणि सीमा पार करून भारतात घुसू पाहणाऱ्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान गंभीररीत्या जखमी झाला आहे.
पाक सीमेवरील रेंजर्सनी सकाळी साडेनऊच्या सुमारास भारतीय हद्दीत गोळीबार सुरू केला. त्यांना तशाच आक्रमक पद्धतीने उत्तर देत बीएसएफच्या जवानांनीही गोळीबार सुरू केला. मात्र शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे प्रत्युत्तर अशा पद्धतीने मिळेल, याचा पाकला अंदाजच नव्हता. त्यामुळे भारतीय जवानांच्या गोळीबारात पाकचे ७ रेंजर्स ठार झाले. कथुआ जिल्ह्यातील दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर हा प्रकार घडला. (वृत्तसंस्था)
पाक माध्यमं म्हणतात, दोन्हीकडून झाला गोळीबार
पाक माध्यमांनीही दोन्हीकडून जोरदार गोळीबार झाल्याचे वृत्त दिले असून, त्यात ५ पाकिस्तानी रेंजर्स मरण पावल्याचे म्हटले आहे. पाक रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या बीएसएफच्या जवानाचे नाव गुरनाम सिंग असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.
याच भागातून एका पाकिस्तानी दहशतवाद्याने भारतीय सीमेवर घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठीही बीएसएफच्या जवानांना गोळीबार करावा लागला. त्यात दहशतवाद्याचा खात्मा झाला.
आता महिलांनी उचलले दगड
शुक्रवारच्या नमाजपूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमधील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी आणि उर्वरित भागात जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे १००हून अधिक दिवसांच्या अशांततेनंतर सामान्य होऊ पाहत असलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले.
या भागांत यापूर्वी शुक्रवारच्या नमाजनंतर अनेकदा हिंसक निदर्शने झाली. या वेळी काही महिलांनीही पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे काही भागात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बारामुल्लामध्ये शोधमोहीम...
बारामुल्लात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली. चार दिवसांपूर्वीही सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या संशयित अड्ड्यांवर धाडी टाकून ४४ जणांना अटक केली होती. तिथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांची संयुक्त पथके अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवीत आहेत. सुरक्षा दलांना अद्याप यश मिळाले नाही. तथापि, शोधमोहीम सुरूच आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले
पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री राजौरी जिल्ह्यात ताबा रेषेलगतच्या भारतीय चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता. या भागात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात गेल्या ४ दिवसांपासून चकमकी झडत आहेत. पाकने गेल्या ४ दिवसांत ५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.