Crime News: एका सॉफ्टवेअर सल्लागारासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बंगळुरुमध्ये भाड्याने घेतलेल्या घरात ते राहत होते. मोलकरणीने आवाज दिल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना मोलकरणीने बोलावले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर ही घटना उजेडात आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांच्या प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली की, पती-पत्नीने आधी दोन्ही मुलांना विष दिले आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृतांची ओळख पटली असून, अनुप कुमार (वय ३८), त्याची पत्नी राखी (वय ३५) आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी अनुप्रिया व दोन वर्षांचा मुलगा प्रियांश, अशी चौघांची नावे आहेत.
अनुप कुमार हे मूळचे उत्तर उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे आहेत. अनुप कुमार एका खासगी फर्ममध्ये सॉफ्टवेअर सल्लागार असल्याने ते बंगळुरूमध्ये कुटुंबासह राहत होते.
मोलकरणीमुळे समोर आली घटना
अनुप कुमार यांच्या घरी कामाला तीन नोकर होते. सोमवारी सकाळी एक मोलकरणी कामासाठी आली. तिने दरवाजा वाजवला, मात्र आतून प्रतिसाद आला नाही. तिने कॉल केले, पण प्रतिसाद न मिळाल्याने तिने शेजाऱ्यांना याची माहिती दिली.
शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना कॉल केला. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला आणि आत शिरले. त्यावेळी चौघांचे मृतदेह आढळून आले.
प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, अनुप आणि राखी या पती-पत्नीने आधी मुलांना विषारी पदार्थ दिला. त्यानंतर दोघांनी गळफास घेतला.
पती-पत्नी मानसिक त्रासातून जात होते, अशीही माहिती समोर आली आहे. त्यांची मोठी मुलगी ही मानसिकदृष्ट्या विकलांग होती. तिला मदतीची गरज पडायची. त्यामुळे त्यांनी एक मदतनीस ठेवला होता. पण, तिच्यामुळे अनुप कुमार आणि त्यांची पत्नी राखी हे तणावाखाली होते, असे त्यांच्या घरी कामाला असलेल्या एका नोकराने सांगितले.
पुद्दुच्चेरीला फिरायला जाण्याचा प्लॅनही त्यांनी बनवला होता. रविवारी त्यासाठी सगळे पॅकिंग केले होते. पण, सोमवारी त्यांचे मृतदेहच घरात सापडले. पोलिसांना घरात कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.